दापोली : सुमारे दीड वर्षापासून संपूर्ण जगात कोरोनाचा धुमाकूळ सुरू आहे. अनेकजणांना कोरोनाने आपला बळी बनवला आहे. अनेक ठिकाणी ऑक्सिजनअभावी रुग्णांचा मृत्यू होत आहे. असे असताना तालुक्यातील सडवली गावाने एकी दाखवत आतापर्यंत सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळल्याने कोरोनाला वेशीबाहेर ठेवले आहे.
पाण्यासाठी वणवण
साखरपा : संगमेश्वर तालुक्यात पाणीटंचाईची तीव्रता अधिकच वाढली आहे. डोंगराळ भागात वसलेल्या वाड्यांना पाण्याचे दुर्भीक्ष्य मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरपासून काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी कित्येक मैलांची पायपीट करावी लागत आहे. आता टंचाई अधिकच वाढली आहे.
दुकानदार धास्तावले
रत्नागिरी : शहरात गेल्या काही दिवसांपासून सकाळी ११ नंतरही दुकान सुरू ठेवणाऱ्या दुकानदारांवर कडक कारवाई करून दहा हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. काही दुकानदार उशिरापर्यंत दुकान सुरू ठेवत असल्याने ग्राहकांची गर्दी होत असते. त्यामुळे प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारल्याने अनेक दुकानदार धास्तावले आहेत.
पावसाची शक्यता
रत्नागिरी : कोकणासह राज्यात आणखी काही दिवस अवकाळी पावसाची स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यानुसार कोकणासह गोवा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.
रक्तदान शिबिर
आरवली : कोरोना काळात रक्ताचा तुटवडा जाणवू नये यादृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मंगळवार दिनांक ११ मे रोजी संगमेश्वर तालुक्यातील तुरळ येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. येथील ग्रामपंचायत कार्यालयात सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत हे शिबिर होणार आहे.
ऑक्सिजनला मागणी
राजापूर : सध्या कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाणही लक्षणीय आहे. त्यामुळे ऑक्सिजनला मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. मात्र खासगी तसेच शासकीय रुग्णालयातही ऑक्सिजन बेड पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे.
एस.टी. फेऱ्यांमध्ये कपात
गुहागर : येथील आगारातून पूर्वी दिवसाला अधिक फेऱ्या सुरू होत्या. मात्र आता कोरोना काळात या आगारातून जिल्ह्यात दोन ठिकाणी केवळ आठच फेऱ्या सुरू आहेत. १५ एप्रिलपासून कडक लॉकडाऊन असल्याने नागरिक बाहेर पडेनासे झाले आहेत. त्यामुळे एस.टी.ला भारमान नसल्याने आठच फेऱ्या सुरू ठेवण्यात आल्या आहेत.