संगमेश्वर तालुक्यातील येडगेवाडी येथील पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश येडगे यांचा सत्कार आमदार शेखर निकम यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
लाेकमत न्यूज नेटवर्क
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील येडगेवाडी येथील सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या ज्ञानेश येडगे यांनी परिस्थितीवर मात करत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवून उपनिरीक्षक हाेण्याचा मान पटकावला आहे. उपनिरीक्षक पदाचे प्रशिक्षण पूर्ण करून आपल्या गावी परतलेल्या ज्ञानेश येडगे यांचे जल्लाेषात स्वागत करण्यात आले.
ज्ञानेश येडगे यांच्या सेवेला मुंबई शहर पोलीस दलातून सुरुवात होणार आहे. यावेळी संतोष येडगे यांनी ज्ञानेश येडगे यांची आयुष्याची संघर्ष गाथा सांगितली. बालपणी वडिलांचे हरपलेले छत्र आणि त्यांच्या वाट्याला आलेली संकटे आणि त्यातून उभारी घेत पोलीस उपनिरीक्षक झालेल्या ज्ञानेश येडगे यांच्याबद्दल माहिती सांगितली. पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश येडगे यांचा आमदार शेखर निकम यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शेखर निकम यांनी त्यांचे कौतुक करत आपल्या मतदारसंघात असे अनेक अधिकारी घडवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. तसेच ज्ञानेश यांनी पोलीस भरतीत सहभागी होणाऱ्या युवकांना मार्गदर्शन करण्याचे आवाहन केले. यावेळी भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू चंदुकाका पंडित, चिपळूण पंचायत समिती उपसभापती पांडुरंग माळी, रत्नागिरी जिल्हा नियोजन समिती माजी सदस्य तुकाराम येडगे, सावर्डे ग्रामपंचायत उपसरपंच जमीर मुल्लाजी, राजीवली ग्रामपंचायत उपसरपंच संतोष येडगे, धोंडीबा येडगे, लक्ष्मण येडगे, अमित सुर्वे, शेखर उकर्डे, शांताराम दुडे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
काेट
ज्ञानेश येडगे यांनी त्याच्या संघर्षातून मिळवलेले यश हे कौतुकास्पद आहे. त्यांच्या संघर्षातून येणाऱ्या पिढीला प्रेरणा मिळेल. माझ्या माहितीप्रमाणे आमदार शेखर निकम हे चांगले काम करत असून त्यांच्या माध्यमातून शैक्षणिक क्रांती घडते आहे. शिवाय विकासही झपाट्याने होत आहे. ज्ञानेश येडगे याला माझ्या शुभेच्छा आहेत.
-चंदुकाका पंडित, माजी क्रिकेटपटू भारतीय क्रिकेट संघ