आरवली : संगमेश्वर तालुक्यातील कडवई आरोग्य केंद्रासाठी वाढीव बेडची गरज लक्षात घेता कडवईतील रत्नागिरी येथे राहणारे उद्योजक कॅप्टन रिझवान जफरुल्ला काझी यांनी तीन बेड आणि एक ऑक्सिजन किट उपलब्ध करून दिले आहे.
यासाठी कडवई प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष यादव यांनी आवाहन केले हाेते. या आवाहनाला प्रतिसाद देत उद्योजक कॅप्टन रिझवान जफरुल्ला काझी यांनी आपल्या आजीच्या नावाने मदतीचा हात दिला आहे. यास्मिन काझी यांची आजी हबिबा जुवळे यांच्या स्मरणार्थ ऑक्सिजन उपलब्ध करून दिला आहे.
कडवई प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष यादव आणि डॉ. निनाद धणे हे कोरोना काळात येथील जबाबदारी पार पाडत आहेत. कॅप्टन रिझवान जफरुल्ला काझी यांनी तीन बेड आणि ऑक्सिजन किट उपलब्ध करून दिले. कडवई या ठिकाणी अतितात्काळप्रसंगी रुग्णाला ऑक्सिजनची गरज भासल्यास तात्पुरत्या स्वरूपात ते उपलब्ध होणार असल्याने दिलासा मिळाला आहे. डॉ. संतोष यादव यांच्या उपस्थितीत तीन बेड आणि ऑक्सिजन कडवई प्राथमिक आरोग्य केंद्राला दिले. यावेळी राजीवली ग्रामपंचायत उपसरपंच संतोष येडगे, कॅप्टन रिझवान जफरुल्ला काझी, नजीर जुवळे, नाना जुवळे, मुश्ताक सावंत, कुमोदिनी चव्हाण आणि इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
--------------------------
संगमेश्वर तालुक्यातील कडवई प्राथमिक आरोग्य केंद्राला कॅप्टन रिझवान जफरुल्ला काझी यांच्या हस्ते ऑक्सिजन सिलिंडर देण्यात आले. यावेळी डाॅ. संताेष यादव, उपसरपंच संताेष येडगे उपस्थित हाेते.