राजापूर : राजापूर विधानसभा मतदार संघातील राजापूर, लांजा तालुक्यांमधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर चांगल्या पद्धतीने आणि लवकर उपचार व्हावेत, यादृष्टीने या दोन तालुक्यांमध्ये कोविड रूग्णालय आणि कोविड केअर सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. तेथे रुग्णांवर उपचार सुरू असून, अनेकजण बरे होऊन घरी गेले आहेत. खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन बेड आणि अन्य वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णांना लाखो रूपये मोजावे लागत आहेत. मात्र, शासनातर्फे उभारण्यात आलेल्या या कोविड रुग्णालयातील ऑक्सिजन बेडमुळे सर्वसामान्य रुग्णांना त्याठिकाणी शून्य खर्चामध्ये उपचार मिळत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाल्याची माहिती आमदार राजन साळवी यांनी दिली.
राजापूर, लांजातील कोरोना रुग्णांना उपचारासाठी यापूर्वी रत्नागिरी येथे जावे लागत होते. मात्र, आमदार फंडातून सुमारे १ कोटी रूपये खर्च करून कोविड रुग्णालय आणि कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहेत. राजापूरमध्ये ओणी येथे ग्रामीण रुग्णालय, रायपाटण आणि धारतळे येथे कोविड केअर सेंटर तर, लांजा येथे कोविड रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. तेथे जास्तीत जास्त वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आयसीयू आणि ऑक्सिजन बेडही उभारण्यात आले आहेत. पुरेसा स्टाफही उपलब्ध आहे. एम. डी. (फिजीशियन) पदासाठी दिलेल्या जाहिरातीला प्रतिसाद मिळालेला नाही. मात्र, उपलब्ध असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने डॉ. राम मेस्त्री रुग्णांवर उपचार करत आहेत. अनेकजण उपचार घेऊन सुखरूपपणे बरे होऊन गेले आहेत. काहीजणांवर उपचार सुरू आहेत. या रूग्णालयांमुळे सर्वसामान्यांचे लाखो रूपये वाचले आहेत. त्यांचा मानसिक त्रासही कमी झाला आहे.
तौक्ते वादळामध्ये रायपाटण कोविड केअर सेंटरमध्ये सौर पॅनेलचा बिघाड झाला होता. त्यामुळे रुग्णांना आंघोळीसाठी गेले काही दिवस गरम पाणी मिळत नव्हते. मात्र, त्या यंत्रणेची आता दुरूस्ती करण्यात आली आहे. तहसीलदार प्रतिभा वराळे, गटविकास अधिकारी सागर पाटील, आरोग्य अधिकारी डॉ. निखिल परांजपे आदींच्या नेतृत्वाखाली राजापूरमध्ये प्रशासकीय यंत्रणा कोरोना आटोक्यात आणण्यासाठी कार्यरत आहे. एम. डी. (फिजीशियन) डॉक्टरांसह अन्य वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी लवकरच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेणार असल्याचे आमदार राजन साळवी यांनी सांगितले.