दापोली : भाजपचे विधानपरिषद सदस्य प्रसाद लाड आणि नीता लाड यांच्या अंत्योदय मुंबई माध्यमातून येथील भाजपला १० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्यात आले आहेत. जिल्हा उपाध्यक्ष केदार साठे आणि भटके विमुक्त कोकण विभागाचे संयोजक भाऊ इदाते यांच्या हस्ते तालुका पदाधिकारी यांच्याकडे ते सुपूर्द करण्यात आले.
गटाराचे काम निकृष्ट
खेड : येथील बसस्थानकासमोरील गटाराचे काम निकृष्ट झाले आहे. ओली माती सिलींगसाठी वापरुन त्यावर काँक्रिटीकरण केले जात असल्याने हे काम अतिशय निकृष्ट पद्धतीचे होणार आहे. यावरुन एस. टी.चे चाक गेल्यास हे काँक्रिटीकरण किती काळ टिकेल, असा प्रश्न विचारला जात आहे.
आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका
राजापूर : तालुक्यातील फुफेरे व करक कारवली प्राथमिक आरोग्य केंद्रांना महाराष्ट्र शासनाच्यावतीने रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. रुग्णवाहिका नसल्याने या आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत होती. मात्र, ही अत्यावश्यक सेवा उपलब्ध झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
मिरगोत्सव कार्यक्रम
गुहागरी : शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून आम्ही बालकवी सिंधुदुर्ग या सामाजिक संस्थेतर्फे ‘मिरगोत्सव’ या ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात जिल्ह्यातील ३० बालकवींनी तसेच त्यांचे पालक आणि शिक्षकांनी सहभाग घेतला होता.
वृक्षारोपण अभियान
आवाशी : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून खेड तालुक्यातील कर्टेल ग्रामपंचायतीच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मास्कचे वाटपही करण्यात आले. कार्यक्रमाला माजी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, सरपंच दिनेश चव्हाण, दिलीप चव्हाण, गजानन कदम, अविनाश चव्हाण, ईश्वर चव्हाण, आदी उपस्थित होते.
कामथेत वृक्षारोपण
चिपळूण : येथील जागरुक नागरिक मंचातर्फे कामथे उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात आंब्याच्या बाटा आणि अन्य वृक्षांच्या बिजांचे रोपण करण्यात आले. या रुग्णालयाच्या आवारात वृक्षांची संख्या फारच कमी असल्याने जागरुक नागरिक मंचातर्फे हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी या मंचाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
दरवाढीने हैराण
रत्नागिरी : गेल्या आठ दिवसात पेट्रोलच्या दरात चारवेळा दरवाढ झाली आहे. दि. ९ जून रोजी पुन्हा २३ पैशाने पेट्रोल वाढले आहे. त्यामुळे आता जून महिन्यात पेट्रोलची दरवाढ भरमसाठ होणार की काय, ही चिंता वाहनचालकांना सतावत आहे. सध्या लॉकडाऊन असूनही पेट्रोलचे दर गगनाला भिडू लागले आहेत. यामुळे सामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
सुशोभिकरणाला प्रारंभ
दापोली : नगर पंचायतीच्या हद्दीत मुख्य रस्त्यांच्या दुतर्फा विविध शोभिवंत झाडे लावून सुशोभिकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. नुकताच पाऊस सुरु झाल्याने आता ‘स्वच्छ दापोली, सुंदर दापोली’ या घोषवाक्याचा नारा देत असलेल्या दापोली नगर पंचायतीने रस्त्याच्या दुतर्फा विविध शोभिवंत झाडे लावण्यास सुरुवात केली आहे.
श्रमदानातून साफसफाई
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील हातीव येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रत्येक वाडीवर श्रमदानाने स्वच्छता उपक्रम राबविला आहे. ‘माझे गाव, स्वच्छ गाव’ या मोहिमेंतर्गत सरपंच नंदकुमार कदम यांच्या संकल्पनेतून श्रमदानाची मोहीम राबविण्यात आली. यात ग्रामस्थांसह सरपंच, उपसरपंच आणि सर्व सदस्य सहभागी झाले होते.
वीज पुरवठा खंडित
चिपळूण : शहरानजीकच्या ओझरवाडीत गेले महिनाभर वीज पुरवठा सातत्याने खंडित होण्याचे प्रकार घडू लागले आहेत. दिवसातून वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तसेच सध्या कोरोनाच्या अनुषंगाने घरात राहूनच काहीजण ऑनलाईन काम करत आहेत. त्यांच्या कामात यामुळे व्यत्यय येत आहे.