मंडणगड : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती, मंडणगड तालुका शाखेतर्फे मंडणगड ग्रामीण रूग्णालयाला दोन ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर देण्यात आले. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. प्रभाकर भावठाणकर, तहसीलदार नारायण वेंगुर्लेकर, संघचालक डाॅ. सुरेश लेंडे, हेमंत भागवत आदी उपस्थित होते.
वाहतूक ठप्प
रत्नागिरी : तालुक्यातील ओरी सोमेश्वर मंदिराजवळील मुख्य रस्त्यावर दरड कोसळल्याने परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती. मुख्य रस्त्यावरच दरड कोसळल्याने धामणसे, नेवरे, कोतवडे, जांभरूण गावांचा संपर्क तुटला होता. मात्र, ग्रामस्थांनी श्रमदानातून दगड, माती दूर करून रस्ता मोकळा केल्याने वाहतूक पूर्ववत झाली.
गणेशमूर्ती रेखाटणे सुरू
दापोली : गणेशोत्सव सप्टेंबरमध्ये असला तरी मूर्तीशाळेत मूर्ती रेखाटण्याचे काम सुरू झाले आहे. कोरोनामुळे यावर्षीही उत्सवावर निर्बंध येण्याची शक्यता आहे. मात्र, तरीही घरोघरी गणेशमूर्ती आणली जाते. त्यातही मूर्तीच्या उंचीवर मर्यादा आल्या आहेत. मूर्ती वाळण्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेऊन मूर्तीशाळेत कामाची लगबग सुरू झाली आहे.
आंबे विक्रीला
रत्नागिरी : शहरात परराज्यातील आंबे विक्रीला आले आहेत. लगंडा, बदामी, दशहरी, केसर, बलसाड आदी विविध प्रकारचे आंबे विक्रीसाठी उपलब्ध असून, त्यांची किलोवर विक्री सुरू आहे. ६० ते १८० रूपये किलो दराने आंबे विकण्यात येत असून, मागणीही वाढली आहे. अन्य फळांच्या तुलनेत आंब्याला चांगली मागणी आहे.
साथींचे आजार
रत्नागिरी : ऋतुमान बदलल्यामुळे साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. ताप, सर्दी, पडसे, उलटी, जुलाब यांनी रूग्ण त्रस्त आहेत. कोरोनाच्या भीतीमुळे डाॅक्टरांकडे जायला रूग्ण घाबरत आहेत, असे चित्र दिसत आहे. त्यापेक्षा थेट औषध दुकानात जाऊन औषधे घेण्यावर भर दिला जात आहे.