मंडणगड : तालुका राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती कायार्लयातर्फे येथील ग्रामीण रूग्णालयाला दोन ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर देण्यात आले आहेत. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. प्रभाकर भावठाणकर, तहसीलदार नारायण वेंगुर्लेकर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
चिपळूण : येथील दिशांतर या संस्थेतर्फे यावर्षी १२९ विद्यार्थ्यांना सात लाख रुपयांच्या शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले आहे. गेल्या चार वर्षांत २१ लाख २ हजार रूपयांची शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. पहिली ते दहावीपर्यंत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येत असून, २,५०० विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे.
पीक स्पर्धेचे आयोजन
चिपळूण : पिकाची उत्पादकता वाढविण्याबरोबर प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे तसेच त्यांनी अधिक उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करावा, या उद्देशाने भात व नाचणी पिकासाठी स्पर्धा आयोजित केली आहे. त्यात अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
भरारी पथक कार्यरत
रत्नागिरी : जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा तक्रारींबाबत धडक मोहीम राबविण्यासाठी जिल्हास्तरीय भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. कृषी विकास अधिकारी अजय शेंडे यांच्या नेतृत्वाखाली हे भरारी पथक कार्यरत झाले आहे.
रस्ते खोदाई
रत्नागिरी : सध्या कडक लाॅकडाऊन सुरू असल्याने शहरातील पाणी वाहिनीचे काम युध्दपातळीवर सुरू झाले आहे. लाॅकडाऊनचा फायदा घेत ठेकेदार कामे उरकण्याचा प्रयत्न करत आहे. रस्ते खोदल्यानंतर ते व्यवस्थित बुजवले जात नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
टाॅवर जमीनदोस्त
मंडणगड : तालुक्यातील साखरी गावात अथक प्रयत्नामुळे मोबाईल टाॅवर उभारण्यात आला होता. मात्र, नुकत्याच झालेल्या वादळामध्ये टाॅवर जमीनदोस्त झाला असून, दोन तालुक्यांमधील ग्राहकांना नेटवर्क सुविधेपासून वंचित राहावे लागणार आहे.
राजीवड्यात क्लिनिक सुरू
रत्नागिरी : शहरातील गजबजलेली लोकवस्ती असलेल्या राजीवडा गावात कोअर कमिटीने मोहल्ला क्लिनिक सुरू केले आहे. जिल्हा प्रशासन व पोलिसांच्या सहकार्याने हे क्लिनिक सुरू करण्यात आल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
वृक्षांचे बीजारोपण
चिपळूण : येथील जागरूक नागरिक मंचातर्फे कामथे उपजिल्हा रूग्णालयाच्या परिसरात आंब्याच्या बाट्या व अन्य वृक्षांच्या बिजांचे रोपण करण्यात आले. उपजिल्हा रूग्णालयाच्या अवतीभोवती वृक्ष कमी असल्याने ही मोहीम राबविण्यात आली.
२८ दिवसानंतर लसीकरण
रत्नागिरी : उच्चशिक्षण घेण्यासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना कोरोना लसीकरणाचा दुसरा डोस २८ दिवसानंतर देण्यात येणार आहे. टोकियो येथे होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी जाणारे स्पर्धक, खेळाडू यांचाही त्यात समावेश करण्यात आला आहे.
युवती सेनेतर्फे वृक्षारोपण
खेड : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त खेड तालुका युवती सेनेतर्फे वृक्षारोपण करण्यात आले. आंबा, काजू, कोकम, वड आदी वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. यावेळी तालुकाप्रमुख सिध्दी शिंदे उपस्थित होत्या.