रत्नागिरी : येथील जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प (ऑक्सिजन जनरेटर प्लांट) उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाकरिता आवश्यक असणाऱ्या टाक्या बसविण्याची प्रक्रिया बुधवारी (दि. १४) पूर्ण करण्यात आली आहे. उर्वरित आवश्यक सर्व मशिनरी व स्पेअर पार्टची उभारणी पुढील आठवड्याभरात करून हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्याचबरोबर रुग्णांचे मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढले आहे. गंभीर रुग्णांसाठी अन्य मोठ्या शहरांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे रुग्णांवर उपचार करताना अनेक अडचणी येत आहेत.
जिल्ह्यात अशी समस्या निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरू करण्यात येत आहे. बुधवारी (दि. १४) आवश्यक असणाऱ्या टाक्या बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. आठवडाभरात या प्रकल्पाची पूर्ण उभारणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.