लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : येथील कामथे उपजिल्हा रुग्णालयात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आदेश दिल्यानुसार ५० सिलिंडरचा ऑक्सिजन प्लांट सुरू होणार आहे. त्यासाठी काही यंत्रणाही येथे दाखल झाली आहे. मात्र, अजूनही काही मशिनरी परदेशातून यायच्या असल्याने दोन महिने ही यंत्रणा रुग्णालयात पडून आहे. परिणामी ऑक्सिजनच्या सिलिंडरसाठी आरोग्य यंत्रणेला नेहमी कसरत करावी लागत आहे.
कामथे उपजिल्हा रुग्णालयाला कोविड रुग्णालय म्हणून जाहीर केल्यानुसार येथे ऑक्सिजनचा पुरेसा साठा आवश्यक आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता येथे भविष्यात ऑक्सिजनचा साठा असणे आवश्यक आहे. यासाठी एप्रिल महिन्यात येथे ऑक्सिजन प्लांट उभारणीसाठी हालचाली सुरू झाल्या. त्यानंतर ऑक्सिजन प्लांटसाठी आवश्यक असलेली यंत्रणाही दाखल झाली. परंतु, आता दोन महिने झाले, तरी ही यंत्रणा रुग्णालयात पडून आहे.
कामथे रुग्णालयात नियमितपणे ८० ते ९० रुग्ण कायम असतात. त्यामुळे या रुग्णालयात ऑक्सिजन प्लांटची नितांत गरज आहे. तूर्तास काही सामाजिक संस्थांनी दिलेल्या ड्युरा सिलिंडर व जम्बो सिलिंडरच्या माध्यमातून ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे. लोटे येथून सिलिंडर भरून आणावे लागत असल्याने कायम त्यावर लक्ष केंद्रित करावे लागत आहे. नुकताच या रुग्णालयात चक्क रिकामा ड्युरा सिलिंडर जोडल्याचा प्रकार घडला. वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने माेठा अनर्थ टळला. अन्यथा तेथे उपचार घेत असलेल्या ५० रुग्णांना त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता होती. त्यामुळे या रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांटचे काम तातडीने मार्गी लावण्याची मागणी होत आहे.
-------------------------
पावसामुळे व परशुराम घाटातील दरडीच्या धोक्यामुळे लोटे येथून ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा करताना काही अडचणी येत आहेत. त्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून खडपोली औद्योगिक वसाहतीतून ऑक्सिजन पुरवठा करण्याची मागणी केली आहे. तत्पूर्वी शासनाकडून कंटेनर स्वरूपात ऑक्सिजन पुरवठा केला जाणार असून, तसे झाल्यास किमान २० दिवस पुरेल इतका ऑक्सिजन उपलब्ध होऊ शकतो.
- डॉ. अजय सानप, वैद्यकीय अधिकारी, कामथे