धरण दुरुस्ती सुरु
दापोली : तालुक्यातील खेम धरणाच्या दुरुस्तीचे काम सुरु असून, १० जूनपर्यंत ते पूर्ण होणार आहे. यामुळे धरणाची गळती थांबणार आहे. धरणात पाणीसाठा होऊन पाणी पुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे. भिंतीच्या क्राँक्रिटीकरणाचे काम पावसाळ्यानंतर पूर्ण होणार आहे. त्यानंतरच धरण ग्रामपंचायतीच्या ताब्यात दिले जाणार आहे.
शेतीची कामे सुरु
चिपळूण : तालुक्यातील रामपूर, मार्गताम्हाणे परिसरात मान्सूनपूर्व दमदार पाऊस कोसळला आहे. त्यामुळे पेरणी, नांगरणी तसेच शेतीच्या मशागतीला प्रारंभ झाला आहे. शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त असून, मजूर उपलब्ध होत नसल्याने नांगरणीसाठी पॉवर टिलरचा वापर केला जात आहे.
बियाण्यांचे वाटप
गुहागर : गुहागर तालुका कृषी अधिकारी कार्यालय व नंदाई अॅग्रो सर्व्हीस यांच्यातर्फे शेतकऱ्यांना शेताच्या बांधावर भातबियाण्यांचे वाटप करण्यात आले. मंडल कृषी अधिकारी भक्ती यादव, कृषी सहाय्यक दत्तात्रय गीते यांनी बियाणे वाटपाबाबत मार्गदर्शन केले.
ग्राहकांमध्ये नाराजी
देवरुख : संगमेश्वर तालुक्यामध्ये वीजबिले अंतिम तारखेला ग्राहकांच्या हातात पडली असून, त्यामुळे बिल भरण्यासाठी आर्थिक भुर्दंड बसत आहे. दंडाची रक्कम भरावी लागत असल्याने ग्राहकांमध्ये महावितरणच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. वीजबिले वेळेवर देण्याची मागणी होत आहे.
कार्यक्रमांचे आयोजन
रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ज्यादिवशी झाला तो दिवस ६ जून रोजी शिवस्वराज्याभिषेक दिन साजरा केला जाणार आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती, ग्रामपंचायतीमध्ये कोरोनामुळे शासकीय नियमावलींचे पालन करुन शिवराज्याभिषेक दिन साजरा केला जाणार आहे.
साळुंखे यांचा सत्कार
देवरुख : केंद्रप्रमुख कृष्णकांत साळुंखे यांचा साखरपा जिल्हा परिषद शाळा क्रमांक १तर्फे सेवानिवृत्तीपर सत्कार करण्यात आला. गेल्या २८ वर्षांच्या सेवेमध्ये साळुंखे यांनी आदर्श शिक्षक, आदर्श केंद्रप्रमुख पुरस्कार मिळवला आहे. चिपळूण, राजापूर, संगमेश्वर तालुक्यात त्यांनी सेवा बजावली आहे.
शिंदे यांची निवड
खेड : तालुका युवती सेनेच्या तालुकाध्यक्षपदी लवेल गावची सुकन्या सिद्धी अजित शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. आमदार योगेश कदम यांच्या हस्ते सिद्धी यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी युवा सेनेचे जिल्हाधिकारी अजिंक्य मोरे, राकेश सागवेकर, चंद्रकांत कदम, शशिकांत चव्हाण, सभापती मानसी जगदाळे, आदी उपस्थित होते.
सवलतीची मागणी
चिपळूण : जिल्हा प्रशासनातर्फे कडक लॉकडाऊन सुरु करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी काही सवलत देण्यात आली आहे. लॉकडाऊन काळामध्ये राईस मिल सुरु ठेवण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. जेणेकरुन शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही.
‘डॉक्टर आपल्या दारी’ कार्यक्रम
चिपळूण : चिपळूण तालुका मुस्लिम विकास मंचतर्फे ‘डॉक्टर आपल्या दारी’ कार्यक्रम राबविण्यात आला. घरोघरी जाऊन डॉक्टर हफिजा परकार यांनी ग्रामस्थांची मोफत आरोग्य तपासणी केली. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. दर रविवारी हा तपासणी कार्यक्रम सुरु होता.