पाऊस सुरू झाल्यावर बी फेकून पेरावे आणि मातीचा थर थोडासा हलवावा. सरी पाडून पेरल्यास रुजवा कमी येतो. बी उगवल्यानंतर त्यास ८ ते १० दिवसांनी प्रतिगुंठ्यावर एक ते दीड किलो युरिया खत द्यावे. खर जमिनीत क्षारांचा निचरा होण्याच्या दृष्टीने भात लागवडीपूर्वी चिखलणी सुरू करू नये. चिखलणी केल्याने क्षारांचा निचरा होण्याच्या प्रक्रियेत अडथळा येतो. खार जमिनीत भात खाचरे समपातळीत असणे आवश्यक आहे. त्यामुळे खाचरातील पाण्याची पातळीही सारखी राहते व क्षारांचा निचरा होण्यास मदत होते. रोपे २५ ते ३० दिवसांची झाल्यावर सरळ व उथळ लागवणी करावी. यामुळे फुटवा लवकर येण्यास मदत होते. तसेच एका चुडात चार ते पाच रोपे लावावी. निमगरव्या जातीसाठी दोन ओळींतील अंतर २० सेंटीमीटर व दोन चुडांतील अंतर १५ सेंटीमीटर ठेवून लावणी करावी. हळ्या जातींची लागवड १५ बाय १५ सेंटीमीटर अंतरावर करावी.
खार जमिनीमध्ये मुख्यत्वेकरून सुरुवातीला लव्हाळा व लोणकट हे तण आढळतात. जमीन ट्रॅक्टरच्या साहाय्याने साधारणत: २५ ते ३० सेंटिमीटर खोलीपर्यंत नांगरली तर तणांचा उपद्रव पुष्कळसा कमी होतो. नंतर शेतात पाण्याचे योग्य प्रकारे व्यवस्थापन केल्यास हे तण नाहीशी होतात. खार जमिनीमध्ये हार नावाचे एक जलतण आढळते. या तणाचे पुनर्जीवन स्पोअर्सने होत असते. तसेच ते पाण्याखाली असल्याने कोणत्याही तणनाशकाचा त्याच्यावर योग्य तो परिणाम होत नाही. त्यामुळे हार तण आढळल्यास ताबडतोब बेणणी करावी. खार जमिनीत आंतरमशागत करणे गरजेचे आहे.
मत्स्यसंवर्धन
खार जमिनी पावसाळ्यामध्ये सतत पाण्याखाली असल्यामुळे भाताबरोबर मत्स्योत्पादन करणे शक्य आहे. खार जमिनीत क्षारांचा निचरा होण्यासाठी शेताच्या सभोवताली चरी काढाव्यात. पावसाळ्याच्या शेवटी शेतातील पाणी कमी झाले तरी अशा चरींत पाणी राहते. त्यामुळे या चरींचा मत्स्यसंवर्धनासाठी उपयोग करून घेता येतो. सिप्रिनस या माशांचे संवर्धन केल्यास भात पीक काळात बऱ्यापैकी वाढ होते.
भूपृष्ठावरील तळी
खार जमिनीत पावसाळ्यात फक्त भाताचे पीक घेता येते. सिंचनाच्या सोयी उपलब्ध नसल्यामुळे रब्बी हंगामात पिके घेता येत नाहीत. खरीप हंगामातही खार जमिनीत भाताचे पीक रोपावस्थेत असताना पावसाचा आठ ते दहा दिवसांचा खंड जमिनीतील क्षारांचे प्रमाण वाढते व रोपे करपतात. तळ्यांमध्ये पावसाळ्यातील गोडे पाणी साठवून त्याचा उपयोग शेतीसाठी करता येतो.
लागवडीबाबत काळजी
लागवडीच्या मानाने रहू किंवा आवटणी कमी खर्चाच्या असल्याने सुरुवातीला परवडतात; परंतु जसजशी जमीन सुधारत जाईल, तसतशी नेहमीच्या पद्धतीने गादीवाफ्यावर रोपे करून लावणी करणेच हितावह ठरते. लावणी करताना रोपांचा चूड फार खोलवर लावू नये. चूड जास्त खोलवर लावला तर जमिनीच्या खालच्या थरात असलेल्या जास्त क्षारामुळे ते जळून जाण्याचा संभव असतो. खार जमिनीत विरळ पिकांचे मुख्य कारण हेच आहे.