महाराष्ट्रात जमिनी व हवामानानुसार भातलागवडीच्या विविध पद्धतींचा अवलंब केला जातो. कोकण व विदर्भातील नागपूर विभागात प्रामुख्याने लावणी पद्धतीने भातपीक घेण्यात येते. याउलट विदर्भातील उर्वरित भाग, पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील १५०० मिलीमीटरपेक्षा कमी पाऊसमान असणाऱ्या प्रदेशात पेरभात व टोकन पद्धतीचा अवलंब केला जातो तर रहू व दापोग पद्धतीचा अवलंब हा आपत्कालीन परिस्थितीत केला जातो.
लावणी पद्धत
ज्या विभागात १५०० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो, तेथे भात रोपे रोपवाटिकेत तयार करून चिखलणी केल्यानंतर विशिष्ट मुदतीत पुनर्लागवड केली जाते. जेथे भातरोपे तयार करून लावणी करणे शक्य होत नाही, अशा ठिकाणी भाताची टोकन पद्धतीने, पेरणी किंवा रहू पद्धतीने लागवड करतात.
पेरणी पद्धती
मराठवाड्यातील काही भाग किंवा पश्चिम महाराष्ष्ट्रात या पद्धतीच्या भातलागवडीचा अवलंब केला जातो. कोकणातही हल्ली या पद्धतीचा अल्प प्रमाणात वापर सुरू झाला आहे. या पद्धतीमध्ये भातकापणीनंतर जमीन नांगरावी नंतर कुळवाच्या चार ते पाच पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. पाऊस पडण्यापूर्वी धूळवाफ पद्धतीने किंवा पाऊस पडल्यानंतर वापस्यावर पाभरीने अथवा तिफणीने (दोन चाड्याची) पेरणी करावी. पेरणीसाठी साधारणत: हेक्टरी ७५ ते ८० किलो बियाणे वापरावे. दोन ओळीतील अंतर २० ते २२.५ सेंटिमीटर ठेवून पाभरीच्या किंवा सरत्याच्या सहाय्याने पेरणी करावी. या पद्धतीमध्ये एका चाड्यातून भातबियाणे व दुसऱ्या चाड्यातून खत पेरावे.
पेर भातामध्ये तणांच्या नियंत्रणासाठी पेरणी झाल्यावर एका आठवड्यामध्ये जमीन ओली असतानाच ॲनिलोफाॅस (एक लिटर पाण्यात ३ मिली) किंवा ब्युटाक्लोर (एक लिटर पाण्यात पाच मिली) या तणनाशकाची फवारणी जमिनीवर करावी. एक गुंठा जागेसाठी पाच ते सहा लिटर पाणी वापरावे.
रहू पद्धत
धूळवाफ्यावर केलेली पेरणी अतिवृष्टीने वाहून गेल्यास व परत गादीवाफे करणे शक्य नसल्यास मोड आलेले बी (रहू) चिखलणीनंतर फेकून पेरले जाते. पाणी आणि तणांचा प्रादुर्भाव असलेल्या खार जमिनीत या पद्धतीचा चांगला उपयोग होतो. हेक्क्टरी ८० किलो बियाणे लागते.
दापोग
या पद्धतीने रोपे तयार करून वर्षातून तीन पिके घेता येतात. दापोग वाफा अंगणात, ओसरीवर, परसात, गच्चीवर, लाकडी पलंगावर, टेबलावर, फळ्यांवर अगर सोयीनुसार करता येतो या वाफ्यात पाणी साठून राहण्यासाठी विटा किंवा लाकडी पट्टीच्या सहाय्याने वाफ्याच्या चारी बाजू ८ ते १० सेंटिमीटर उंच कराव्यात. वाफा तयार करण्यासाठी प्लास्टिकचा कागद वापरावा. वाफ्याची रूंदी सर्वसाधारणपणे १.५ मीटर ठेवावी. लांबी मात्र सोयीनुसार असावी.