खेड : प्रशासकीय दृष्टीने सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यात असणाऱ्या, मात्र भौगोलिकदृष्ट्या केवळ खेड तालुक्याला संलग्न असलेल्या कांदाटी खोऱ्यातल्या शिंदी, वळवण, उचाट या गावांमध्ये गवारेड्याने भातलावणीसाठी रुजवात केलेला भाताचा रूजून आलेला तरवा (छोटी भात रोपे) खाऊन टाकल्याने शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.खेड ते खोपी मार्गाचे रघुवीर घाट फोडून विस्तारीकरण करण्यात आल्यामुळे दळणवळणाच्या दृष्टीने सातारा जिल्ह्यातील कांदाटी खोरे रत्नागिरी जिल्ह्याशी जोडले गेले आहे. पावसावर अवलंबून असलेले आणि वर्षातून एकदाच घेतले जाणाऱ्या भात पिकावर आलेल्या गवारेड्यांच्या संकटामुळे खोऱ्यातले शेतकरी अक्षरशः हवालदिल झाले असून, वन विभागाकडून साधे पंचनामेही झाले नाहीत. आता वर्षभर काय खायचे, असा प्रश्न या शेतकऱ्यांसमोर उभा आहे. वन विभागाकडून नुकसानभरपाई नाही मिळाली तर आत्महत्या करण्याचा निर्णय येथील शेतकऱ्यांनी घेतला आहे.कोयना धरण बांधल्यानंतर अनेक गावे पुनर्वसित झाली तर काही गावकरी त्याचठिकाणी राहिले. सद्य:स्थितीत या गावातील अनेकजण नोकरीधंद्यासाठी मुंबई - पुण्याला गेले. येथे राहणारे ग्रामस्थ पारंपरिक भातशेतीवर अवलंबून आहेत. यावर्षीही त्यांनी पारंपरिक पद्धतीने पावसाळ्यात भात पेरणी केली. मात्र, पेरणी करून उगवलेल्या भाताचे तरवे कोयना अभयारण्यात असलेल्या गवा रेड्यांनी खाऊन उद्ध्वस्त केले आहेत. वर्षभर ज्या भातशेतीवर अवलंबून राहावे लागते तीच भातशेती गवारेड्याने उद्ध्वस्त केल्याने आता वर्षभर खायचे काय, असा प्रश्न येथील शेतकऱ्यांना पडला आहे.महाबळेश्वर तालुक्याच्या वन विभाग कार्यालयाकडे वारंवार सांगूनही शेताची पाहणी आणि पंचनामाही वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेला नाही. वर्षभर पोटाची भूक भागवणारे भात पीक पूर्णच नष्ट झाल्याने शेताच्या बांधावर गळफास घेऊन आत्महत्या करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नसल्याचे येथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.कोयना धरणानंतर आता या कांदाटी खोऱ्यात वास्तव्याला असणाऱ्या गावांची अवस्था ना घर का, ना घाट का अशी झाली आहे. अत्यंत दुर्गम आणि जंगलमय भागात राहात असलेले हे लोक शासनाकडून मोठी अपेक्षा ठेवत नाहीत. मात्र, पारंपरिक शेती करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या या शेतकऱ्यांना आवश्यक गोष्टींची पूर्तता व नुकसानभरपाई तरी द्यावी, अशी मागणी केली जात आहे.
कांदाटी खोऱ्यात गवारेड्याकडून भात उद्ध्वस्त, वन विभागाच्या दुर्लक्षामुळे शेतकरी संतप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 5:40 PM