चिपळूण : सुरुवातीपासूनच हुलकावण्या देणाऱ्या पावसाने जुलै महिन्यातही पाठ फिरवल्याने शेतकरी अक्षरशः हवालदिल झाले आहेत. गेल्या तीन दिवसांत पावसाची सरासरी घसरल्याने जिल्ह्यात बहुतांशी ठिकाणी भातलावणीचे काम ठप्प झाले आहे. ग्रामीण भागातील डोंगर उतारावरील शेती तर कोरडी पडली आहे. पाऊस आणखी लांबल्यास पुन्हा एकदा रोपांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.यावर्षी मृग नक्षत्रापासूनच सर्व नक्षत्रे कोरडी गेली. तब्बल २४ जूनपर्यंत पावसाने हजेरी लावली नव्हती. त्याचवेळी बिपरजॉय चक्रीवादळामुळे पाऊस सुरू झाला आणि त्यानंतर जून महिन्याच्या अखेरीस दमदार पावसाला सुरुवात झाली. जुलैच्या पहिल्या आठवड्यातही पावसाचा जोर चांगला होता. भाताची रोपे तयार झाल्याने पहिल्या आठवड्यात भात लावणीच्या कामाला वेग आला होता. मात्र, रविवारपासून (९ जुलै) पावसाने पूर्णतः उघडीप घेतली असून, कडक उन्हामुळे पाण्याची पातळी झपाट्याने कमी झाली आहे. परिणामी शेतजमिनी कोरड्या पडू लागल्या आहेत. या परिस्थितीमुळे ग्रामीण भागात भात शेतीची कामे ठप्प झाली आहेत.चिपळूण तालुक्यात एकूण १० हजार हेक्टर क्षेत्र भात लागवडीखाली येते. त्यापैकी केवळ १००५ हेक्टर क्षेत्रावर भातशेतीची लागवड झाली आहे. अजूनही ९० टक्के भात शेती लागवडीचे काम शिल्लक आहे. अशा परिस्थितीत पाऊस न पडल्यास आणखी बिकट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. गेल्या चार दिवसांत तालुक्यात केवळ ४२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यातील दोन दिवसांत १० मिलिमीटरदेखील पाऊस पडलेला नाही. ग्रामीण भागात कालवे, पाझर किंवा तलावांच्या स्वरूपात काही ठिकाणी पाणी उपलब्ध असले तरी ते शेतजमिनीत आणताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यातच परिसरातील विहिरींची पाणी पातळी पुन्हा घटल्याने पिण्याचा पाण्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने भातलावणीची कामे रखडत चालली आहेत. चिपळूण तालुक्यात दहा हजार भातलागवडीचे क्षेत्र आहे. मात्र, त्यापैकी केवळ १० टक्केच भातलावणीची कामे झाली आहेत. एक-दोन दिवसांत चांगला पाऊस पडल्यास लावणीची कामे लवकर पूर्णत्वास जातील. शेतकऱ्यांनी एक रुपयाच्या विम्याचाही लाभ घ्यावा. - मनोज गांधी, कृषी पर्यवेक्षक, चिपळूण