रत्नागिरी : खरीप हंगामासाठी रत्नागिरी जिल्ह्याला ७,०२६ क्विंटल भात बियाण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीनुसार ४,०१६ क्विंटल भातबियाणे उपलब्ध झाले आहे. उर्वरित ३ हजार १० क्विंटल भातबियाणे लवकरच उपलब्ध होणार आहे.जिल्ह्यात एकूण ७० हजार ३३४ हेक्टर क्षेत्रावर भात लागवड केली जाते. त्यासाठी साडेचार हजार क्विंटल भात बियाण्याची पेरणी करण्यात येते. गतवर्षी साडेतीन हजार क्विंटल भात बियाण्याचे वाटप करण्यात आले होते. मात्र, कमी पर्जन्यवृष्टीमुळे दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर ओढवले होते. अतिरिक्त भातबियाणे उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना बियाण्यासाठी वणवण करावी लागली होती. त्यामुळे यावर्षी ही समस्या पुन्हा उद्भवू नये, याकरिता कृषी विभागातर्फे ७०२६ क्विंटल भात बियाण्याची मागणी करण्यात आली आहे. यानुसार महाबीजकडून १२४० तर खासगी कंपन्यांकडून २७७६ क्विंटल भातबियाणे उपलब्ध झाले आहे.लवकरच रोहिणी नक्षत्राला प्रारंभ होणार आहे. काही ठिकाणी धूळवाफेच्या पेरण्या करण्यात येतात. त्यामुळे शेतकऱ्यांना बियाण्यांसाठी प्रतीक्षा करावी लागणार नाही, याची काळजी घेत बियाणे उपलब्ध करण्यात आले आहे. बहुतांश पेरण्या मृग नक्षत्राच्या पावसावर करण्यात येतात. त्यामुळे उर्वरित बियाणे लवकरच उपलब्ध होणार आहे. उपलब्ध भातबियाणे खरेदी - विक्री संघ व जिल्हा संघाकडे विक्रीसाठी उपलब्ध असून, शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन तालुकास्तरावर हे बियाणे उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तालुकास्तरावर कृ षी विस्तार अधिकाऱ्यांमार्फत खते व बियाण्यांचे वाटप करण्यात येणार आहे.खरीप हंगामासाठी रत्नागिरी जिल्ह्यासाठी १९ हजार मेट्रिक टन खतास मंजुरी मिळाली आहे. गतवर्षी १७ हजार मेट्रिक टन खत जिल्ह्याला उपलब्ध झाले होते. त्याचे वाटप १०० टक्के करण्यात आल्याने यावर्षी दोन हजार मेट्रिक टन अतिरिक्त खताची मागणी करण्यात आली आहे. आतापर्यंत ५,२६०.६५ मेट्रिक टन खत उपलब्ध झाले असून, शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पावसाळ्यापूर्वी खताचे वितरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ४५८ खत विक्रेत्यांना अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. त्यांच्यामार्फत शासनमान्य खतांची विक्री केली जाणार आहे. विक्री प्रक्रिया तपासणीसाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार आहे.जिल्ह्यात एकूण ६५,१०९ हेक्टर क्षेत्रावर आंबा पिकाची लागवड करण्यात आली असून, ५८ हजार ८३७ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. ९१,५०३ हेक्टर क्षेत्रावर काजूची लागवड करण्यात आली असून, ८३,२९२ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. याशिवाय नारळ व अन्य बागायतींसाठीदेखील खते मागविण्यात येतात. साधारणत: आंबा काढणीनंतर खते घालण्याची कामे सुरु होतात. भात लागवडीपूर्वी बागायतींना खते घातल्यास पावसाळ्यात ती चांगली लागू पडतात. त्यामुळे शेतकरी सध्या खते खरेदी करत आहेत. (प्रतिनिधी)
भातबियाण्याचा पुरवठा सुरु
By admin | Published: May 25, 2016 10:11 PM