फोटो कॅप्शन : रत्नागिरी शहरातील मुख रस्ता खोदल्यामुळे वाहतुकीला अडथळा झाल्याने वाहतूक पोलीस निरीक्षक शिरीष सासने यांनी तत्काळ ठेकेदाराला जाऊन सूचना केल्या. (छाया : तन्मय दाते)
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : शहरात सुधारित नळपाणी याेजनेच्या कामासाठी पाेलीस यंत्रणेनेला काेणतीच पूर्वकल्पना न दिल्याने साेमवारी वाहतुकीची खेळखंडाेबा झाला हाेता. याबाबतची माहिती मिळताच वाहतूक शाखेचे पाेलीस निरीक्षक शिरीष सासने यांनी कामाच्या ठिकाणी जाऊन संबंधित ठेकेदाराची चांगलीच कानउघाडणी केली. त्यामुळे काही तासांतच वाहतूक सुरळीत झाली.
दाेन दिवसांच्या वीकेंड लाॅकडाऊनची संधी साधत रत्नागिरी नगर परिषदेने शहरात सुधारित नळपाणी याेजनेचे काम वेगाने सुरू केले हाेते. रस्त्यावरील वर्दळ कमी असल्याने मुख्य रस्त्यावर खोदाई करण्यात आली. साळवी स्टाॅपकडून मारुती मंदिरकडे जाणाऱ्या रस्त्यावर खोदाई करण्यात येत असल्याने साेमवारी काही वाहतूक कार्निव्हल हाॅटेलच्या बाजूच्या रस्त्याने वळविली हाेती. अचानक वाहतुकीच्या रस्त्यात बदल केल्याने वाहनचालकांचा गाेंधळ उडाला. त्यामुळे वाहतूक काेंडीची समस्या निर्माण झाली हाेती.
मार्गावरील वाहतूक इतरत्र वळविताना त्याची कल्पना वाहतूक शाखेला देणे गरजेचे हाेते. पण तसे न केल्याने वाहतुकीचा अधिक खाेळंबा झाला. याची माहिती मिळताच वाहतूक पोलीस निरीक्षक शिरीष सासने यांनी कामाच्या ठिकाणी जाऊन ठेकेदाराला याबाबत विचारणा केली. रस्त्यावरील वाहतूक वळविताना वाहतूक शाखेला कल्पना देणे गरजेचे असल्याचे सांगून वाहतूक तत्काळ सुरळीत करण्याची सूचना केली. तसेच रस्त्यावर मारलेले चर याेग्य पद्धतीने बुजविले जात नसल्याची बाबही शिरीष सासने यांनी निदर्शनाला आणून दिली. त्यानंतर काही तासांतच ही वाहतूक सुरळीत झाली.