चिपळूण : शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत येथील नगरपरिषदेने ४० बेडचे कोविड केअर सेंटर कै. अण्णासाहेब खेडेकर क्रीडा संकुल येथे उभारण्याचा धोरणात्मक निर्णय सोमवारी ऑनलाईन झालेल्या विशेष सभेत घेतला. तूर्तास हे सेंटर पेड स्वरूपात उभारले जाणार असून, येथे शहरातील रुग्णांवर प्राधान्याने उपचार केले जाणार आहेत तसेच नगर परिषदेतर्फे रुग्णांसाठी रेमडिसिविर औषध व ऑक्सिजन मोफत दिले जाणार आहे.
शहरातील वाढत्या रुग्णसंख्येमुळे येथील आरोग्य यंत्रणेवर ताण येऊ लागला आहे. अनेकदा रुग्णांना बेडही मिळत नाही. विशेषतः शहरातील रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याने अनेक नागरिकांची गैरसोय होऊ लागली आहे. याची गंभीर दखल काही दिवसांपूर्वी चिपळूण दौऱ्यावर आलेल्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी घेतली आणि शहरात कोविड केअर सेंटर उभारण्याची सूचना नगरपरिषदेला केली. नागरिकांकडूनही तशी जोरदार मागणी होऊ लागली. त्यानुसार नगरपरिषदेने या विशेष सभेचे आयोजन केले होते.
नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत येथील अपरांत हॉस्पिटलच्या माध्यमातून सुसज्ज सेंटर उभारण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. यावर चर्चा करताना वैद्यकीय सेवा 'अपरांत'ने पाहावी तर त्यासाठी लागणाऱ्या सुविधा व इमारत नगरपरिषदेने पुरवावी. ऑक्सिजन प्लांट उभारून त्याठिकाणी गरज असलेल्या रुग्णांना मोफत ऑक्सिजन पुरविण्यात यावा तसेच रेमडिसिविर औषधही संबंधित रुग्णांना मोफत दिली जावीत, असे निर्णय यावेळी घेण्यात आले.
दारिद्र्यरेषेखालील रुग्णांना व अंत्योदय योजनेंतर्गत पिवळे रेशनकार्ड धारक असलेल्या रुग्णांना महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेचा लाभ देण्यात यावा, असाही निर्णय घेण्यात आला. याबाबतचा ठराव उपनगराध्यक्षा सुधीर शिंदे यांनी मांडला. त्याला अनुमोदन उमेश सकपाळ यांनी दिले.
तातडीने होणार कार्यवाही
सुमारे एक कोटी ७० लाख रूपये खर्च या सेंटर साठी अपेक्षित असून त्याच्या खर्चालाही मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार तातडीने या कामाला सुरुवात केली जाणार आहे. सुरुवातीला हे सेंटर पाग हायस्कूलमध्ये उभारण्याचा प्रस्ताव होता. मात्र, स्थानिक पातळीवर नागरिकांचा विरोध लक्षात घेत अखेर खेडेकर क्रीडा संकुलात कोरोना केअर सेंटर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.