लोकमत न्यूज नेटवर्क
पाचल : राजापूर तालुक्यातील तळवडे ब्राह्मणदेव येथे अर्जुना धरणाच्या डाव्या कालव्यात दरड कोसळल्याने कालव्यालगत असलेल्या घरांना धोका निर्माण झाला आहे. ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शासनाने या ग्रामस्थांचे स्थलांतर करून भविष्यात त्यांचे चांगले पुनर्वसन करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुरेश गुडेकर यांनी केली आहे.
पाटबंधारे विभागातर्फे अर्जुना मध्यम प्रकल्पाची उभारणी करण्यात आली असून, त्यामध्ये पाणीसाठाही मुबलक आहे. मात्र या कालव्यांची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे येथील शेतकरी पाण्यावाचून वंचित आहेत. अर्जुनाच्या या डाव्या कालव्यात चार दिवसांपूर्वीच भलीमोठी दरड कोसळली असून कालव्यात मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा झाला आहे. पावसाचा जोर असाच वाढत राहिला तर कालवा फुटून कालव्याखालील शेती व घरे वाहून जाण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. या कालव्याच्या लगत बाबाजी गोरे, अनिल कोलते, सुदाम कोलते यांची घरे व गोठे आणि भातशेती आहे. पावसामुळे पाण्याचा लोंढा वस्ती घरामध्ये घुसल्यास मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षीही हा कालवा फुटून ग्रामस्थांच्या घरात पाणी घुसले होते तसेच शेतीही वाहून गेली होती. पाटबंधारे विभागाने या शेतकऱ्यांना अद्याप एका पैशाचीही मदत केलेली नाही. या भागात सातत्याने मुसळधार पाऊस पडत असून, दरड कोसळण्याचा धोका वाढला आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन शासनाने येथील ग्रामस्थांना स्थलांतरित करून भविष्यात त्यांचे चांगले पुनर्वसन करावे, अशी मागणी सुरेश गुडेकर यांनी केली आहे. अन्यथा भविष्यात येथे मोठी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त हाेत आहे.