अडरे : दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट थांबवण्यासाठी राज्य शासनाकडून विविध उपाययोजनांवर भर दिला जात आहे. याच पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये कोरोनाबाबत जनजागृती व्हावी यासाठी आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागातर्फे शहर व ग्रामीण भागातील सार्वजनिक ठिकाणी जनजागृती संदेश देणारे पेंटिंग काढले जात आहेत.
चिपळूण शहरातील मध्यवर्ती बसस्थानक, नगर परिषद, पोस्ट ऑफिस या परिसरातील भिंती काेरोना जनजागृती संदेशांनी रंगवल्या आहेत. काेरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. तो कमी करण्यासाठी राज्य शासनासह स्थानिक प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. कोरोनाची जनजागृती व्हावी यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. काेरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहर परिसरात विविध ठिकाणी जनजागृती करून संदेश देणारे पेंटिंग काढले जात आहेत. संकटाशी करू दोन हात, महाराष्ट्र शासनाची खंबीर साथ, मास्क वापरा, वारंवार साबणाने हात धुवा, सॅनिटायझरचा वापर करा, सामाजिक अंतर ठेवा, असे संदेश देणारे पेंटिंग काढण्यात आले आहेत.