लोकमत न्यूज नेटवर्क
पाली : दोन दिवसांच्या वीकेंड लॉकडाऊनला मुंबई - गोवा आणि रत्नागिरी - कोल्हापूर या दोन महामार्गावरील पाली बाजारपेठेत उत्तम प्रतिसाद मिळाला. गेले दोन दिवस बाजारपेठेत पूर्णत: शुकशुकाट होता. त्यामुळे नेहमीच वाहनांच्या वर्दळीत गजबजलेले हे महामार्ग पूर्णत: थांबले होते.
मेडिकल स्टोअर्स, पेपर स्टॉल, खासगी दवाखाने, एस.टी. स्थानक आणि सद्य:स्थितीत बाजारपेठेतील सुरू असलेले चौपदरीकरणाचे काम याव्यतिरिक्त बाजारपेठेतील सर्व दुकाने बंद होती. लॉकडाऊन अतिशय कडक पद्धतीने पाळण्यात यावा यासाठी पालीच्या तलाठी कदम, ग्रामसेवक आशिष खोचाडे, सरपंच विठ्ठल सावंत, उपसरपंच संतोष धाडवे, संदीव गराटे, विभागप्रमुख तात्या सावंत यांनी बाजारपेठेत फिरून लॉकडाऊनच्या अंमलबजावणीविषयी आवाहन केले होते.
पालीमध्ये सध्या स्थानिक पातळीवर कोरोना पॉझिटिव्ह मिळत असल्याने सामूहिक लॉकडाऊनच्या माध्यमातून स्थानिक पातळीवरील ही साखळी तोडणे अनिवार्य असल्याने शनिवारपाठोपाठ रविवारीही तीव्र स्वरूपाचा कडकडीत बंद पाळण्यात आला. पालीचे सरपंच विठ्ठल सावंत, उपसरपंच संतोष धाडवे, संदीप गराटे, श्रीकांत राऊत, विभागप्रमुख तात्या सावंत, अमर कोलते हे लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर लक्ष ठेऊन होते.
दोन्ही महामार्गांवर काही तुरळक प्रमाणात मालवाहतूक वाहने व एस. टी. बस धावत होत्या. लांजा डेपोमधून लांजा - रत्नागिरी व रत्नागिरी डेपोमधून रत्नागिरी - कोल्हापूर अशा तुरळक बसफेऱ्या सुरू होत्या. मात्र, कोल्हापूर महामार्गावरील एस. टी. वाहतूक रत्नागिरी आगाराने थांबविली होती, तर लांजा आगाराने लांजा - रत्नागिरी व राजापूर आगाराने राजापूर - रत्नागिरी या बसफेऱ्या प्रत्येकी चार- चार अशा स्वरूपात सुरू केल्या. मात्र, बस मार्गावर पूर्णत: रिकाम्या धावत होत्या.