राजापूर
: तालुक्यातील रेल्वे स्टेशन परिसरातील पंचक्रोशी ग्रामविकास समिती, राजापूर (मुंबई)च्या पदाधिकाऱ्यांतर्फे प्राथमिक आराेग्य केंद्राला सुविधा पुरविण्यासाठी निधी संकलन सुरू आहे़ या पार्श्वभूमीवर रेल्वे स्टेशन परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी देण्यात आल्या़ तेथील कोरोना रुग्ण व लसीकरणासंदर्भात माहिती घेतली़ या संदर्भात शासनाकडे लवकरच पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही उपस्थित वैद्यकीय अधिकारी यांना समितीतर्फे देण्यात आली.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंचक्राेशीतील आरोग्य केंद्र व रुग्णांना प्राथमिक सुविधा मिळण्याकरिता या समितीतर्फे विविध माध्यमांतून कार्यकर्त्यांमार्फत देणगी स्वरूपात निधी संकलन करण्यात येत आहे. ग्रामीण व मुंबईतील कार्यकर्त्यांकडून निधी संकलनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. जमा झालेल्या देणगीतून प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्राणवायू मशीन तसेच इतर उपयुक्त अत्यावश्यक साहित्य देण्यात येणार आहे. या संदर्भात प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी देऊन वैद्यकीय अधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात आली.
यावेळी ज्या ज्या गोष्टीची कमतरता असेल त्याची पंचक्रोशी समितीतर्फे जेवढे देता येईल त्या वस्तूंची पूर्तता करण्यात येणार आहे़ तसेच वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता आरोग्य कर्मचारी यांच्यावर वाढत असलेला कामाचा ताण याबाबतही दखल घेऊन तातडीने आरोग्य कर्मचारी भरती करण्याबाबत लोकप्रतिनिधी व शासन दरबारी पत्रव्यवहार व भेट घेऊन यासंदर्भात पाठपुरावा करणार असल्याचे समिती अध्यक्ष अनिल भोवड व पदाधिकारी यांनी उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांना ग्वाही देण्यात आली.
शासनाच्या सूचनेनुसारच लसीचे डोस देण्यात येत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांमधून यावेळी सांगण्यात आले. जसजशी लस उपलब्ध होते तशा सूचना ग्रामस्थांना देण्यात येत असल्याचे येथील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. शेट्ये, समितीचे अध्यक्ष अनिल भोवड, सचिव विश्वास राघव, दीपक मोंडे, पत्रकार राजेंद्र बाईत, अनंत सावंत, सुधीर विचारे, प्रशांत सावंत, फुफेरे ग्रामपंचायत सदस्या समृद्धी लिगम यांच्यासहित आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.