देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील पांगरी गाव भौगोलिक दृष्टीने डोंगराळ भाग असून गावातील वाड्या दूरवर विखुरलेल्या आहेत. दुर्गम भागात असल्याने या गावातील काही वाड्यांना अनेक सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे. सध्या ग्रामस्थ दळणवळणाचे प्रमुख साधन असलेल्या एस. टी. सेवेची प्रतीक्षा करीत आहेत. पांगरी - वायंगणे जोडरस्ता डांबरीकरण झाल्यास देवरूख-वायंगणे- रत्नागिरी एसटी सेवा सुरू होईल. परिणामी, या गावामधील विविध वाड्यांमधील ग्रामस्थांचे हाल व सोसावा लागणारा आर्थिक भूर्दंड दोन्हीही वाचेल.
२०११ च्या जनगणनेनुसार गावची लोकसंख्या सुमारे ११२५ इतकी आहे. सध्या पांगरीमार्गे देवरूख आणि रत्नागिरीकडे अशा गाड्या जातात. परंतु, हा मार्ग गावच्या एका बाजूने गेला असून प्रत्यक्षात या गावातील ७० टक्के लोकवस्ती रस्त्यापासून दूर अंतरावर वसलेली आहे. घोडवली फाटा ते शाळा पांगरी नं. २ पर्यंत नुकतेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधून रस्ता डांबरीकरण पूर्ण झाले आहे. हा ग्रामीण मार्ग ५७ अशी नोंद असून तो पुढे कोंडवाडी- वायंगणे - पांगरी पोस्ट असा जोडरस्ता आहे.
सध्या वायंगणे येथेही मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधून रस्ता डांबरीकरण झाले आहे. पांगरी शाळा क्र.२ ते धारेखालील वाडी असे एकूण अंदाजे ४/४.५ किमी. रस्ता डांबरीकरण झाल्यास वायंगणे व पांगरीतील ग्रामस्थांना फायद्याचे ठरणार आहे. सध्या त्यांना दैनंदिन रोजीरोटी, शैक्षणिक, वैद्यकीय उपचार यासारख्या अत्यावश्यक बाबींसाठी कमालीचे कष्ट सहन करावे लागत आहेत. पांगरी - वायंगणे जोडरस्ता डांबरीकरण झाल्यास देवरूख-वायंगणे- रत्नागिरी एसटी सेवा सुरू होण्यासाठी पर्याय रस्ता उपलब्ध होणार आहे. ग्रा. मार्ग. ५७, ग्रा. मार्ग ४ व ग्रा. मार्ग ३४१ एकमेकांना जोडले जाऊन नागरिकांना सोयीस्कर होणार आहे. सद्यस्थितीत रस्ता डागडुजी होणे अत्यावश्यक असल्याने मुख्यमंत्री किंवा प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेमधून निधी मंजूर झाल्यास गुणवत्तापूर्ण काम होऊन ग्रामस्थांचे हाल वाचतील.
कोट..........
पांगरीच्या पलीकडे वेळवंड गाव आहे अतिशय डोंगराळ भाग असून तिथे दररोज एसटी फेऱ्या सुरू आहेत. विशेष म्हणजे, वाडीवाडीतून रस्ता असल्याने सर्वांना एसटी सेवा मिळत आहे. वेळवंडची एसटी इथल्या शेतकऱ्यांचे घड्याळ ठरत आहे. वेळेवर एसटी फेऱ्या असल्याने शेतकऱ्यांना वेळेचा अंदाज बांधून काम करता येते. पांगरीतही एसटी सेवा सुरू होऊन आमच्या शेतकऱ्यांना एसटीरूपी हक्काचे घड्याळ मिळावे. यासाठी ग्रामपंचायत माध्यमांतून लोकप्रतिनिधींचे सहकार्य घेऊन पाठपुरावा सुरू आहे.
सुनील म्हादे, सरपंच, पांगरी
या बातमीला २८ रोजीच्या शोभना फोल्डरला पांगरी नावाने फोटो आहे.