गावनामा भाग-१ --मेहरुन नाकाडे - रत्नागिरी- महाराष्ट्र शासनाने गावातील तंटे सोडविण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू केली. या मोहिमेची मुख्य जबाबदारी अत्यल्प मानधनावर काम करणाऱ्या पोलीसपाटलांकडे देण्यात आली आहे. दुहेरी भूमिका बजावताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागते. शिवाय वेळप्रसंगी पदरमोड करून गावातील बैठकांचे वाडीवस्तीवर निमंत्रण पोहोचविण्याबरोबर पोलीस ठाण्याला तडजोडनामा सादर करण्यापर्यंतची सर्वच कामे करावी लागतात.शासनाच्या तंटामुक्त गाव मोहिमेत तंटामुक्त समितीप्रमाणेच सरपंच व पोलीसपाटील यांचा समावेश करण्यात आला आहे. सरपंचपद हे जनतेतून निवडून गेलेले असल्यामुळे गावचा प्रथम नागरिक म्हणून तंटामुक्त समितीला मिळालेल्या यशाचे श्रेय जाते. गावातील शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ग्रामस्थ व पोलीस यांच्यातील दुवा म्हणून पोलीसपाटलांकडे पाहिले जाते. त्यामुळे तंटामुक्त समितीमध्ये महत्त्वाची भूमिका पोलीसपाटील बजावत असल्याचे दिसून येत आहे.राज्यात महात्मा गांधी तंटामुक्त अभियान १५ आॅगस्ट २००७ पासून सुरू झाले. ते राबवित असताना पोलिसांना माहिती देणारा दुवा म्हणून पोलीस पाटलांवर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली. तूटपुंज्या मानधनावर काम करणारे पोलीसपाटील आपली जबाबदारी निभावत आहेत. सुरूवातीला ८०० रूपये मानधन असलेल्या पोलीसपाटलांचे मानधन आता ३००० रूपये इतके झाले आहे. परंतु तडजोडनाम्याच्या झेरॉक्स काढण्यापासून ते पोलीस ठाण्यात सादर करण्यापर्यंतची सर्व कामे त्यांना स्वखर्चाने करावी लागतात. किमान तीन ते चार वेळा तडजोडनामे घेऊन पोलीस ठाण्यात जावे लागते. गावचे रेकॉर्ड ठेवण्यासाठी कोणत्याही प्रकारचा स्टेशनरी खर्च त्यांना दिला जात नाही. त्यांच्या खिशाला चाट बसतो.ग्रामस्थ व पोलीस यांच्यातील दुवा मानला जाणाऱ्या पोलीस पाटलावर तंटामुक्तिचा भार सोपवण्यात आला आहे. मात्र, त्यासाठी त्याला कोणत्याही स्वरूपाचा मोबदला दिला जात नाही. वास्तविक पोलीसपाटलांना प्रवास भाडे व भत्ता मिळणे आवश्यक आहे. जेणेकरून महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम आणखी वृध्दिंगत होण्यास मदत होईल. वास्तविक सण असो वा कोणतेही कार्य, गावात शांतता आणि सलोखा ठेवण्याचे आवाहन पोलीसपाटील करतो. किंबहुना गावात बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांसमवेत स्वत: उपस्थित राहून आपली महत्त्वाची भूमिका बजावतो. परंतु अल्प मानधनामुळे पोलीसपाटील उपेक्षित राहात असल्याचे दिसून येत आहे.
तंटामुक्तीत होते पोलीसपाटलांची फरफट--तंटामुक्त
By admin | Published: November 23, 2014 10:05 PM