खेड : एस. टी. बसच्या वाहकानेच प्रवाशांना चक्क वापरलेल्या तिकिटांचा पेनाने क्रमांक टाकून दिल्याचा धक्कादायक प्रकार परळ-खेड गाडीत उघडकीला आला. तिकीट तपासनिकांच्या पथकाने २१ सप्टेंबर राेजी भरणे नाका येथे हा बाेगस तिकिटांचा प्रकार उघडकीला आणला असून, या चार तिकिटे सुमारे १२०० रुपये किमतीची आहेत.
एस. टी. बसमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांवर एस. टी. महामंडळाचे प्रशासन करडी नजर ठेवणार आहे. त्यासाठी २२ सप्टेंबर ते ६ ऑक्टाेबर या कालावधीत एस. टी. तिकीट तपासण्यांची मोहीम सुरू केली आहे. ही माेहीम सुरू होण्याच्या एक दिवस अगोदर २१ सप्टेंबरला परळ - खेड गाडी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास भरणे नाका येथे आली असता तिकीट तपासनिसांच्या पथकाने तपासणी केली. या तपासणीमध्ये एस. टी.च्या वाहकाने चार प्रवाशांना वापरलेल्या तिकिटांचा क्रमांक पेनाने टाकून सुमारे बाराशे रुपये किमतीची चार बोगस तिकिटे दिल्याचे पुढे आले. काहीवेळा तिकीट मशीनमध्ये प्रिंटर व्यवस्थित काम करत नसल्यास अर्धवट प्रिंट असलेल्या तिकिटावर वाहक पेनाने दुरुस्ती करून तिकीट देतात. त्याच उपाययोजनेचा गैरफायदा घेत या वाहकाने या चार प्रवाशांना बोगस तिकिटे दिल्याचे समाेर आले आहे. परळ-खेड गाडीत चार बोगस तिकिटे सापडल्यानंतर त्या गाडीतील वाहकाचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविला असल्याची माहिती एस. टी.च्या अधिकाऱ्यांनी दिली.
------------------------------
लांजा, दापाेलीतील प्रवाशांकडून दंड
अशिक्षित किंवा परप्रांतीय प्रवाशांना कोऱ्या तिकीट रोलवर लिहून तिकिटे दिली जात असल्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे एस. टी. महामंडळाने एस. टी.मधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात तिकीट तपासणी मोहीम सुरू केली आहे. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी लांजा आणि दापोली तिकीट हरवलेले प्रत्येकी दोन प्रवासी आढळले होते. त्या प्रवाशांकडून दंड आकारला तसेच त्यांना पुन्हा तिकीट काढावे लागले.