गुहागर : राष्ट्रीय सेवा योजना उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र यांच्यातर्फे प्रत्येक जिल्ह्यात देण्यात येणाऱ्या एकमात्र ‘काेविड याेद्धा’ पुरस्कारासाठी गुहागरच्या प्रथमेश परांजपे याची निवड झाली आहे. सोमवार, दि. ६ सप्टेंबर राेजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
काेविड संसर्गजन्य परिस्थितीत राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांकडून विविध मदतकार्य करण्यात आले. या कार्यामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या स्वयंसेवकाची प्रत्येक जिल्हानिहाय निवड करण्याचे राष्ट्रीय सेवा योजना (मंत्रालय कक्ष)तर्फे ठरविण्यात आले आहे. गुहागर शहरातील खरे - ढेरे - भोसले महाविद्यालयात शिकणारा प्रथमेश श्रीपाद परांजपे याची निवड जिल्ह्यातील सर्व उच्च व तंत्रशिक्षण महाविद्यालयांमधून करण्यात आली आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उच्च महाविद्यालयात शिकणाऱ्या आरती रामू मंजू या विद्यार्थिनींची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. हा सोहळा रत्नागिरीमधील गाेगटे - जोगळेकर महाविद्यालयात होणार आहे.