चिपळूण : सलग पडणाऱ्या पावसामुळे परशुराम घाटातील डोंगराची एक बाजू माती आणि दगडासह थेट खाली आली. सुदैवाने वाहतूक सुरू असलेल्या रस्त्यावर माती आणि दगड आले नाहीत. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे सुरळीत सुरू होती. परंतु परशुराम गावाकडील हा डोंगर हळूहळू खाली येत असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. ठेकेदार कंपनीने दरडीची माती व दगड बाजूला करण्याचे काम सुरू केले आहे.मुंबई गोवा महामार्गावरील अत्यंत महत्वाचा घाट असलेल्या परशुराम घाटात पावसाळ्यात दरड कोसळणे हे नेहमीचे समीकरण राहिले आहे. दरडीची माती आणि दगड थेट महामार्गावर येऊन येथील वाहतूक ठप्प पडण्याचे व पर्यायाने महामार्गावरील वाहतूक बंद पडण्याचे प्रकार सातत्याने घडत होते. तसेच घाटाच्या पायथ्याशी असलेल्या पेढे गावाला या दरडीचा सतत फटका बसत होता. त्यामुळे पेढे गावाला संरक्षण म्हणून येथे भली मोठी संरक्षण भिंत उभारण्यात आली. परंतु दुसऱ्या बाजुचा डोंगर मात्र नेहमीप्रमाणे धोक्याची घंटा देत आहे. डोंगराची माती आणि दगड सातत्याने खाली सरकत आहेत. त्यामुळे दरडीचा धोका येथे कायम राहिला आहे.चिपळुणात गुरुवारपासून मुसळधार पाऊस पडत आहे. सलग पडणाऱ्या या पावसामुळे पुन्हा एकदा परशुराम घाटात दरड खाली आली. परंतु सुदैवाने ती वाहतूक सुरू असलेल्या मार्गावर आली नाही. वाहतूक सुरू असलेल्या रस्त्यावर दरडीची माती दगड येऊ नये म्हणून उपाययोजना करण्यात आलेली आहे. तरी देखील दरडीचे काही दगड रस्त्याच्या कडेला येऊन पडले, परंतु वाहतुकीला त्याचा अडथळा झालेला नाही. वाहतूक पूर्णपणे सुरळीत राहिली आहे. दरड कोसळल्याचे समजताच राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी तसेच पोलिसांनी धाव घेऊन पाहणी केली व ठेकेदार कंपनीला तात्काळ सूचना देऊन माती व दगड बाजूला करण्याचे आदेश दिले. त्यानुसार येथे कामाला सुरुवात करण्यात आली आहे. दरडीचा परिणाम वाहतुकीवर झाला नसला तरी परशुराम गावातील ग्रामस्थ मात्र भयभीत झाले आहेत. हळूहळू डोंगरच खाली येत असल्याने येथील घरांना धोका निर्माण झाला आहे.
परशुराम घाटात दरड कोसळली, स्थानिक ग्रामस्थ भयभीत
By संदीप बांद्रे | Published: July 08, 2023 5:17 PM