फोटो कॅप्शन : जिल्हा परिषद सेवक सहकारी पतपेढीमध्ये झालेल्या निवडणुकीत चेअरमन पदावर पुन्हा परिवर्तन पॅनलेचे परशुराम निवेंडकर यांची निवड झाली. परिवर्तन पॅनेलचे अध्यक्ष राजू जाधव, माजी चेअरमन नितीन तांबे, शैलेश वाघाटे, प्रभाकर कांबळे यांनी अभिनंदन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषद सेवक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन या रिक्त पदासाठी २ एप्रिल रोजी निवडणूक पार पडली. यावेळी चेअरमनपदी परिवर्तन पॅनेलचे उमेदवार परशुराम तुकाराम निवेंडकर यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अध्यासी अधिकारी यांनी जाहीर केले.
तत्पूर्वी निवडणूक प्रक्रियेदरम्यान झालेल्या नाट्यमय घडामोडीमध्ये अध्यक्षपदासाठी परशुराम निवेंडकर आणि अन्य एक अर्ज दाखल करण्यात आला होता. बंडखोर उमेदवार संस्थेचा थकीत कर्जदार असल्याचा आक्षेप निवेंडकर यांनी घेतला. त्याबाबत निवडणूक अध्यासी अधिकारी यांनी संस्थेच्या सचिवांकडून लेखी अभिप्राय घेतला. या अभिप्रायाला अनुसरून निवडणूक अध्यासी अधिकारी यांनी बंडखोर उमेदवाराला अर्ज बाद ठरवून निवेंडकर यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.
निवेंडकर हे कापरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सहाय्यक या पदावर कार्यरत आहेत. समाजाभिमुख आरोग्य कार्यक्रम तसेच उपक्रम राबवून त्यांनी थोड्याच कालावधीत आपल्या कामाचा ठसा उमटविलेला आहे. या निवडीनंतर मागे झालेल्या अनियंत्रित कर्जवाटपावर अंकुश ठेवून पतसंस्थेला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे आव्हान नवनिर्वाचित चेअरमन निवेंडकर यांच्या पुढे आहे.
नवनिर्वाचित चेअरमन परशुराम निवेंडकर यांचे परिवर्तन पॅनेलच्या राजू जाधव, पी. टी. कांबळे तसेच परिवर्तन पॅनेलचे संचालक नितीन तांबे, राजेंद्र रेळेकर, दीपक गोरिवले यांनी अभिनंदन केले.