रत्नागिरी : मतिमंद मुलांसाठी कार्यरत असलेल्या ‘आविष्कार’ संस्थेच्या सौ. सविता कामत विद्यामंदिर शाळेतील तसेच श्री. शामराव भिडे कार्यशाळेतील मुलांच्या ‘हटके’ कलाविष्काराने पालक भारावून गेले. आपल्या मुलांना कला सादर करताना पाहून अनेक पालकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.मतिमंद मुलांचे गुणदर्शन कार्यक्रम सादर करून घेण्यासाठी करावी लागणारी तयारी म्हणजे या शाळेतील शिक्षकवर्गासाठी हे आव्हानच असते. मात्र, गेले अनेक वर्षे हे आव्हान ही शिक्षकमंडळी पेलवून या मुलांकडून उत्कृष्ट सादरीकरण करून घेत आहेत. यासाठी महिने - दोन महिने परिश्रम घेऊन या मुलांकडून पूर्ण तयारी करून घेतली जाते. त्यामुळे पालकांना आपल्या मुलांची कला प्रत्यक्ष रंगमंचावरच पाहायला मिळते. शनिवारी या दोन्ही संस्थेच्या संयुक्त स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी या मुलांनी विविधांगी कार्यक्रम सादर करून उपस्थितांना अचंबित केले. कार्यक्रमाची सुरूवात ईशस्तवनाने झाली. अतिशय उत्कृष्ट अशा नृत्याने या मुलांनी उपस्थितांचे स्वागत करतानाच नाट्यगृहातील साऱ्यांची मने जिंकून घेतली. सामान्य मुलांसारखेच किंबहुना त्याहीपेक्षा सरस अशा एकापेक्षा एक कलाकृती पाहताना उपस्थितांना विशेषत: माता पालकांना आपल्या भावना आवरता येत नव्हत्या.आॅटिझम मुलांनी गाण्यातून रंगांचा वर्षाव केला. प्राथमिक शाळेच्या मुलांनी ‘शेपटीवाल्या प्राण्याची भरली होती सभा’ सादर करून प्राण्यांना रंगमंचावर आणले. सध्या टीव्हीवर ‘जय मल्हार’ मालिका चांगलीच गाजते आहे. या मालिकेचे प्रसिद्ध शीर्षक गीतावर व्यवसायपूर्व गटातील मुलांनी उत्तम नृत्य सादर केले. माध्यमिक गटाने नाटिकेतून मानवता धर्माची महती सांगितली. त्यानंतर कार्यशाळेच्या दोन विद्यार्थ्यांनी ‘आता माझी सटकली’ या ‘सिंघम २’ चित्रपटातील गीतावर नृत्य सादर करून रंगत आणली. त्यानंतर अर्धा तासाचे नमन खेळे सादर करून पारंपारिक लोकनृत्याचा आनंद मिळवून दिला. कार्यक्रमादरम्यान गुणवंत विद्यार्थी, कार्यशाळेतून बाहेर पडून स्वयंरोजगार मिळवू लागलेले संस्थेचे माजी विद्यार्थी, संस्थेला सहकार्य करणाऱ्या व्यक्ती व आस्थापना यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी मीरा लिमये होत्या. सूत्रसंचालन वैशाली जोशी तर आभारप्रदर्शन सचिन सारोळकर यांनी केले. स्वागत व परिचय संस्थेच्या अध्यक्ष नीला पालकर यांनी केले. या कार्यक्रमाला अनेक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद लाभला. (प्रतिनिधी)
‘आविष्कार’च्या ‘कलाविष्कारा’ने पालक भारावले
By admin | Published: March 03, 2015 9:14 PM