चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील चौपदरीकरणाच्या कामामध्ये अडथळे निर्माण होऊ नयेत यासाठी पुढील एक महिना दिवसाचे सहा तास वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. आज सोमवारपासून या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. मात्र, घाट बंद करताना बांधकाम कंपनीकडून बॅरिकेट्स व फलक उपलब्ध न केल्याने बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांची तारांबळ उडाली.परशुराम घाटातील चौपदरीकरणाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण व्हावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. साधारण २ किलोमीटर अंतराचा हा घाट असून, त्यातील ४०० मीटर अंतराचा घाट अत्यंत धोकादायक आहे. याभागात २३ मीटर उंचीपर्यंतच्या दरडी असल्याने व बराचसा भाग मुरूमाचा असल्याने हा धोका आणखी वाढला आहे. त्याशिवाय घाटाच्या माथ्यावर व पायथ्याला वस्ती असल्याने येथील अनेक कुटुंब भीतीच्या छायेत आहेत. तूर्तास घाटाच्या खालील बाजूस सुमारे दीडशे मीटरहून अधिक लांबीची संरक्षक भिंत उभारण्यात आली आहे.तसेच रस्त्याच्या वरील बाजूनेही संरक्षक भिंत उभारण्यात येणार आहे. त्यानंतर एकेरी मार्गाचे काँक्रीटीकरण आधी पूर्ण केले जाणार आहे. पावसाळा तोंडावर आल्याने या कामाची घाई सुरु झाली आहे. त्यासाठी सोमवारी सकाळी ११ वाजल्यापासून घाटातील वाहतूक बंद केली. ही वाहतूक कळंबस्ते, आंबडस मार्गे चिरणी, लोटे या पर्यायी मार्गावर वळविल्याने दुपारनंतर वाहनांची मोठी गर्दी झाली होती.परशुराम घाट बंद ठेवण्याच्या निर्देशानंतर ठेकेदार चेतक कंपनीकडून त्याची कोणतीही तयारी करण्यात आली नव्हती. त्यामुळे सोमवारी पहिल्याच दिवशी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांची तारांबळ उडाली. अखेर प्रांताधिकारी प्रवीण पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी, पोलीस निरीक्षक राजेंद्र शिंदे, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपविभागीय अधिकारी प्रकाश निगडे, शाखा अभियंता आर. आर. मराठे यांनी सवतसडा धबधब्यासमोर पोलीस बंदोबस्त असलेल्या ठिकाणी भेट देऊन त्याठिकाणी तातडीने सूचना फलक उभारण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार मंगळवारपासून नियोजन केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
Parshuram Ghat: परशुराम घाट पुढील एक महिना 'या'वेळेत वाहतुकीसाठी बंद राहणार, काम सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 6:51 PM