दस्तुरी : गेले आठ दिवस परतीच्या पावसाने कोकणाला चांगलेच झोडपले आहे. या मुसळधार पावसाचा खेड बाजारपेठेसह तालुक्याच्या ग्रामीण भागालादेखील मोठा फटका बसला आहे. मुंबई- गोवा महामार्गावरील जगबुडी नदीच्या ब्रिटिशकालीन पुलावरून अद्यापही एकेरी वाहतूक सुरू आहे. भोस्ते व परशुराम घाटात ठिकठिकाणी दरडी कोसळून मुंबई-गोवा महामार्ग ठप्प झाला आहे. कशेडी घाटात काही ठिकाणी दरडीचा भाग खाली आल्याने हा घाटदेखील ‘डेंजर झोन’मध्ये आला आहे. या घाटमाथ्यावरील दरडी काढण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. महामार्गावरील परशुराम घाटातील अवघड वळणांवर अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या असून, या दरडी काढण्याचे काम आज (रविवारी) राष्ट्रीय महामार्ग खात्यामार्फत सुरू होते. या दरडी हटविण्यासाठी दोन जेसीबींच्या सहाय्याने काम सुरू असून, त्यामुळे महामागावरील दोन्ही बाजूची वाहतूक सुमारे पाऊण तास ठप्प होती. या दरडी हटविल्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूला तीन ते चार किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली. परंतु, दरडी मोकळ्या करणे आवश्यक असल्याने आणखी काहीवेळ थांबू, असाच सूर वाहनचालकांच्या तोंडून ऐकायला मिळत होता. (वार्ताहर)
परशुराम घाटाची वाताहात; मुंबई-गोवा महामार्ग ठप्प
By admin | Published: September 25, 2016 11:03 PM