गुहागर : गुहागर - विजापूर महामार्गाच्या कामातील ठेकेदाराच्या गलथान कारभाराचा फटका वाहनांना बसला आहे. पाटपन्हाळे येथे एस.टी. बस चिखलात रुतली, तर घोणसरे गायकरवाडी येथे अवघड वळणावरील मोरीच्या अर्धवट कामामुळे रस्त्यावरुन पाणी गेल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला.
एटीएम केंद्रांमध्ये खडखडाट
मंडणगड : कोरोना संसर्गाच्या गेल्या दोन वर्षांपासून सर्वच एटीएम केंद्र वीकेंडला बंद राहत आहेत. यामुळे तालुक्यात बाहेरुन येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. सर्वच राष्ट्रीयीकृत बँकांनी याकडे दुर्लक्ष केल्याने ग्राहकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
तिडे-निमदेवाडी शाळेला देणगी
मंडणगड : तालुक्यातील निमदेवाडी येथील मुंबईस्थित ग्रामस्थ संजय निमदे यांनी तिडे निमदेवाडी जिल्हा परिषद शाळेत तीन हजार रुपयांची देणगी दिली. शालेय शैक्षणिक व खेळाचे साहित्य घेण्यासाठी या निधीचा धनादेश त्यांच्या आई राजेश्री निमदे व वडील पांडुरंग सुतार यांच्याकडे सुपूर्द केला.
होमगार्ड मानधनापासून वंचित
चिपळूण : कोरोनाच्या काळात जीव धोक्यात घालून पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून बंदोबस्तादरम्यान महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या जिल्ह्यातील होमगार्डसना मार्च महिन्यापासून मानधन मिळालेले नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. मानधन लवकरात लवकर मिळावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
दापोली-शिवाजीनगर येथे लसीकरण
दापोली : तालुक्यातील शिवाजीनगर भौंजाळी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत कोरोना लसीकरण उत्साहात पार पडले. यावेळी कोविशिल्ड लसीचे १५० डोस लाभार्थ्यांना देण्यात आले. तालुक्यातील आसूद प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायत शिवाजीनगर यांच्यामार्फत हे डोस देण्यात आले.