संदीप बांद्रे / चिपळूण- मुंबईहून रत्नागिरीकडे जाणाऱ्या एसटी बस पावसामुळे तब्बल तीन तास मार्गातच खोळंबल्याने येथील प्रवासी वैतागले आणि त्यांनी चक्क बस स्थानकातच सोमवारी रात्री ९.४५ च्या दरम्यान हंगामा घातला. अखेर या प्रवाशांना चिपळूण आगारातून एसटी बस उपलब्ध करून देण्यात आली. त्यानंतर काहीसे तणावाचे बनलेले वातावरण शांत झाले.
मुंबईतील भिवंडी व नालासोपारा येथून रत्नागिरीकडे येणारी बस चिपळूण बस स्थानकात सायंकाळी ७ वाजेपर्यंत नेहमी पोहोचतात. त्यामुळे चिपळूण बस स्थानकातील प्रवासी या बसने नेहमी रत्नागिरीकडे जातात. तसेच कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या बंद असल्याने एसटी बस सेवेवर अधिक ताण वाढला आहे.त्यासाठी चिपळूण आगारातून रेल्वेच्या प्रवाशांसाठी दिवसभरात १५ जादा बस सोडण्यात आल्या. मात्र पावसामुळे मुंबईकडून येणाऱ्या गाड्या देखील उशिराने धावत आहेत. भिवंडी व नालासोपाराहून रत्नागिरीकडे येणाऱ्या एसटी बसही प्रवासात खोळंबल्याने पुढील प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. त्याशिवाय नेहमीच्या प्रवाशांसोबतच रेल्वेच्या प्रवाशांची ही भर पडल्याने बस स्थानकात मोठा गोंधळ निर्माण झाला.
अखेर तीन तास होऊनही भिवंडी व नालासोपारा बस न आल्याने या प्रवाशांचा पारा आणखी वाढला. त्यामुळे बस स्थानकात काहीसे तणावाचे वातावरण निर्माण झाले. अखेर चिपळूण आगारातून रत्नागिरी मार्गावर एसटी बस सुरू सोडून संबंधित प्रवाशांना मार्गस्थ करण्यात आले.