देवरूख : देवरूख एस. टी. आगाराचा गलथान कारभार पुन्हा एकदा ऐेरवणीवर आला आहे. आगाराचे वेळापत्रक पूर्णत: कोलमडले असून, त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. आगारातून दुपारी १२.३० वाजता सुटणारी देवरूख - कुळ्ये गाडी वेळेत न सुटल्याने प्रवाशांनी आगारातून सुटणारी देवरूख- रत्नागिरीबस अडवून आपला संताप व्यक्त केला. अखेर २ वाजता देवरूख - कुळ्ये गाडी मार्गस्थ झाली.देवरूख आगारातून १२.३० वाजता देवरूख सायलेमार्गे कुळ्ये ही बस फेरी सोडण्यात येते. मात्र, ही बस गेली अनेक दिवस उशिरा सुटत असल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. अशातच शुक्रवारी ही बस वेळेत न सुटल्याने प्रवासी आक्रमक झाले.एक तास झाला तरी ही बस न सुटल्यामुळे प्रवाशांनी आक्रमक होत १.३० वाजता देवरूख - रत्नागिरी बस आगारातून सुटताच या बस समोर येऊन सायले पंचक्रोशीतील प्रवाशांनी ही बस रोखून धरली. अचानक हा प्रकार घडल्याने रत्नागिरी बसमधील प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
बस अडवून धरण्याचा हा प्रकार तब्बल २० मिनिटे सुरू होता. प्रवाशांनी बस रोखून धरल्याने आगार प्रशासनाची तारांबळ उडाली. अखेर आगार प्रशासनाने कुळ्ये बसला आधीच झालेला उशीर लक्षात घेऊन प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी उपलब्ध चालक, वाहक कर्मचाऱ्यांकडून ही बसफेरी २ वाजता सोडण्याची घोषणा केली.बस आगारात लागताच या प्रवाशांनी बसमध्ये बसण्यासाठी धाव घेतली. यानंतर देवरूख - रत्नागिरी बस २ वाजता रत्नागिरीच्या दिशेने रवाना करण्यात आली. मात्र, कुळ्ये ही बस तब्बल दीड तास उशिराने सुटली. तत्पूर्वी रत्नागिरीकडे जाणारी बस प्रवाशांनी बस रोखून धरली होती.गलथान कारभारदेवरूख आगाराचा गलथान कारभार गेली काही महिने चव्हाट्यावर येत आहे. आगारातून बसेस वेळेत न सुटणे, गाडी अर्ध्यावर बंद पडणे यांसारख्या अनेक समस्यांना प्रवाशांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे तालुक्यातील प्रवासी पुरता हैराण झाला आहे. त्याचीच प्रचिती शुक्रवारी सायले - कुळ्ये गावातील प्रवाशांना आली.