राजापूर : महापुरात छातीभर पाण्यातून मार्ग काढत वीज पुरवठा सुरू करण्यासाठी प्रचंड धडपड केलेल्या तालुक्यातील मोसम येथील वायरमन रूपेश महाडिक यांच्या धाडसाबद्दल आमदार राजन साळवी यांनी भेट घेत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.
नगरपंचायतीकडून वाहतूक बंद
मंडणगड : चार दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे माहू उत्तेकरवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मोरी व तिला लागून असणारा रस्ता वाहून गेला आहे. मंडणगड अडखळ मार्गावरील नगरपंचायतीचे हद्दीतील धोकादायक मोरीवजा पूल नगरपंचायतीने वाहतुकीसाठी बंद केला आहे.
मनसेतर्फे सत्कार
वरवेली : गुहागर तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पालशेत परिसरातील कोरोना रुग्णांची अविरत सेवा करणारे कोविड योद्धा डॉ. बाळासाहेब ढेरे यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपविभाग अध्यक्ष प्रसाद विखारे, यश पालशेतकर, हरेश पटेकर, रूपेश बारगोडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
कर्जासाठी युवकांची पायपीट कायम
रत्नागिरी : बेरोजगार युवक उद्याेग सुरू करण्यासाठी कर्जाकरिता बँकेच्या चकरा मारत आहेत. मात्र, तारण नसल्याचे कारण पुढे करीत बँका कर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहेत. कोरोनाच्या काळात ठप्प झालेले आर्थिक व्यवहार पुन्हा सुरू व्हावेत यासाठी तरुण पुढे आले आहेत.
राष्ट्रवादीचे कार्यकर्ता संवाद अभियान
रत्नागिरी : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रांतीक सदस्य बशीर मुर्तुझा आणि पक्षप्रतोद सुदेश मयेकर हे २७ जुलैपासून शहरामध्ये कार्यकर्ता संवाद अभियान सुरू करणार आहेत. त्यामुळे रत्नागिरी शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.