पाथर्डी फाटा : पाथर्डी फाट्यावरील गजबजलेला चौक आणि सर्व्हिस रोडवरील वाढती वाहतूक यामुळे या चौकात सायंकाळच्या सुमारास भरणाऱ्या भाजीबाजारामुळे धोकेदायक परिस्थिती निर्माण झाली आहे. भररस्त्यात भरणाऱ्या या बाजारामुळे निर्माण होणारा संभाव्य धोका लक्षात घेता अधिकृत भाजीबाजाराची व्यवस्था करावी, अशी मागणी होऊ लागली आहे. प्रभाग क्रमांक ५२ आणि परिसरात मोठ्या प्रमाणात नागरी वसाहत वाढत आहे. या परिसरासाठी मनपाने काही प्रमाणात सोयीसुविधा पुरविल्या आहेत. मात्र अधिकृत भाजी मंडई नसल्यामुळे सर्व्हिस रोडवरच भाजीबाजार भरत आहे. विक्रेत्यांचा माल आणि त्यांची वाहने, ग्राहकांची वाहने आणि रस्त्यावरील वाहतूक या साऱ्यांची एकच गर्दी होते आणि वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. यामुळे कित्येकदा हमरीतुमरीचे प्रकार घडतात. प्रकरण हाणामारीपर्यंतही पोहचते त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचादेखील प्रश्न निर्माण होतो. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना असुरक्षितही वाटू लागले आहे. मनपाचा अधिकृत भाजीबाजार नसल्यामुळे रस्त्यावरील विक्रेत्यांकडे त्यांना भाजीपाला घेण्यासाठी जावे लागते. शिवाय कधी लेखानगर, पवननगर येथे भाजी घेण्यासाठी जावे लागते. परिसरातील नागरिकांची ही परिस्थिती पाहता पाथर्डी परिसरात मनपाच्या जागेत अद्ययावत असा भाजीबाजार बांधावा, अशी मागणी परिसरातून होऊ लागली आहे.
पाथर्डी फाट्यावरील बाजार धोकादायक
By admin | Published: February 02, 2016 11:11 PM