रत्नागिरी : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत आता हळूहळू घट होऊ लागली आहे. दुसऱ्या लाटेचा फटका युवकांना अधिक बसला आहे तसेच १४ वर्षाखालील सहा बालके कोरोनाबाधित झाली आहेत. सुदैवाने एकाही बालकाचा मृत्यू झालेला नाही. जिल्हा प्रशासनाने दररोज १० हजार कोरोना चाचणी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
संशोधन परीक्षेत यश
रत्नागिरी : मुंबई विद्यापीठातर्फे आयोजित अविष्कार संशोधन स्पर्धेत येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील ऋतुजा शिंदे, चिन्मय प्रभू यांनी सुवर्णपदक पटकावले आहे. प्रा. अजिंक्य पिलणकर यांच्या मार्गदर्शनाखाली या दोघांनी सलग तिसऱ्यांदा सुवर्णपदक पटकावले आहे.
इसवलीत नुकसान
लांजा : तालुक्यातील इसवली पनोरे - मोरेवाडी येथे मंगळवारी पहाटे पाच घरांवर आंब्याचे झाड कोसळल्याने या घरांचे नुकसान झाले आहे. यात काहीजण किरकोळ जखमी झाले आहेत. सरपंच आकांक्षा नरसले, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, सभापती मानसी आंबेकर, जिल्हा परिषद सदस्य पूजा आंबोळकर आदींनी घटनास्थळी तातडीने भेट दिली.
रस्ता खचला
चिपळूण : गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात मुसळधार पावसाने जोर घेतला आहे. या पावसामुळे तालुक्यातील वीर, देवपाट गावातील मोगरीवाडा येथील रस्ता पूर्णपणे खचला असून, वाहतूक पूर्णत: बंद झाली आहे. त्यामुळे मोगरीवाडी, घेवडेवाडी, शिगवणवाडी आणि बंदरवाडी या वाड्यांच्या दळणवळणाची गैरसोय मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली आहे.
भातपीक शेतीशाळेला भेट
दापोली : तालुका कृषी विभागाच्यावतीने विविध शासकीय योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे, शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन करणे याकरिता कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त नांदगाव (जाखलवाडी) येथे भातपीक शेतीशाळा वर्गाला शेतकऱ्यांनी भेट दिली. यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
रक्तदानाला प्रतिसाद
सावर्डे : गडकिल्ले संवर्धन क्षेत्रात अग्रेसर असलेल्या राजे सामाजिक प्रतिष्ठानतर्फे दुर्ग संवर्धनासोबत इतरही अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. त्यातील महत्त्वाचा उपक्रम म्हणून रक्तदान शिबिर हे गेली सात वर्षे घेतले जात आहे. दि. २४ जुलै रोजी श्रीदेव सोमेश्वर आणि देवी करंजेश्वरी देवस्थान येथे हे रक्तदान शिबिर आयोजित केले आहे.
खिचडी वाटप
खेड : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने आषाढी एकादशीनिमित्त येथील बसस्थानकाच्या परिसरात मंगळवारी खिचडी वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मनसेचे सरचिटणीस तसेच नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम राबविला गेला.
माजी शिक्षक मेळावा
दापोली : ए. जी. हायस्कूलमध्ये माजी शिक्षकांचा मेळावा नुकताच आयोजित करण्यात आला होता. मुख्याध्यापक सतीश जोशी यांनी स्वागत केले. शैक्षणिक प्रगती, शालेय प्रशासन आदींविषयी माहिती दिली. संस्था संचालक व सचिव डॉ. प्रसाद करमरकर यांनी बालवाडी ते पदव्युत्तरपर्यंतच्या सर्व विभागांचा आढावा घेतला.
वाळू उत्खनन सुरुच
दापोली : आंजर्ले, पाडले येथे राजरोसपणे वाळू उत्खनन अजूनही सुरुच आहे. हा रस्ता गेल्या निसर्ग वादळात समुद्राकडील बाजूला खचला होता. त्यामुळे यावरील अवजड वाहतूक बंद होती. या कामाला जून महिन्यात मंजुरी मिळून संरक्षक भिंतीचे काम सुरु झाले आहे. परंतु, त्याखालील वाळू उपसा सुरु झाल्याने भिंतीला धोका निर्माण झाला आहे.
आषाढी एकादशी साजरी
खेड : तालुक्यातील वेरळ येथील श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आषाढी एकादशी कोरोनाचे नियम पाळून साजरी करण्यात आली. यानिमित्त प्रशालेचे संस्थापक, अध्यक्ष सुयश पाष्टे यांनी विठ्ठल-रखुमाईच्या प्रतिमेचे पूजन करुन आषाढी एकादशीचे महत्त्व सांगितले.