रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या भरमसाठ वाढू लागली आहे. या रूग्णांसाठी जिल्हा शासकीय रूग्णालय तसेच महिला रूग्णालयांबरोबरच आता डेडिकेटेड कोरोना रूग्णालये (डी. सी. एच. सी.) तसेच कोरोना केअर सेंटर (सी. सी. सी) येथील खाटाही अपुऱ्या पडू लागल्याने आता जिल्हा प्रशासनाने ज्या रूग्णांना अजिबातच लक्षणे नाहीत किंवा साैम्य लक्षणे आहेत, अशा रूग्णांना होम आयसोलेशनमध्ये रहाण्याची परवानगी दिली आहे. सध्या लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रूग्णांचीच संख्या अधिक असल्याने जिल्ह्यात होम आयसोलेशनमध्ये असलेल्यांची संख्या वाढू लागली आहे. जिल्ह्यात सध्या होम आयसोलेशनमध्ये दोन हजारपेक्षा अधिक रूग्ण आहेत. मात्र, ज्या रूग्णांना अजिबातच लक्षणे नाहीत, असे रूग्ण बाहेर फिरत असल्याने त्यांच्यापासून इतरांना संसर्ग होण्याचा धोकाही वाढला आहे.
जुलै महिन्यात कोरोना रूग्णांची संख्या राज्यभरातच वाढू लागली. यात साैम्य किंवा अजिबातच लक्षणे नसलेल्या रूग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणावर होती. वाढत्या रूग्णसंख्येमुळे राज्यातील कोरोना रूग्णालये, तसेच कोविड केअर सेंटरही अपुरी पडू लागल्याने अखेर शासनाने अजिबातच लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रूग्णांना तज्ज्ञ डाॅक्टरांच्या मार्गदर्शनाखाली घरीच राहून उपचार घेण्यासाठी परवानगी दिली. मात्र, त्यासाठी अशा रूग्णांकडून घरातील इतरांना होणारा संसर्ग टाळण्यासाठी घरातच स्वतंत्र व्यवस्था असणे गरजेचे असते. त्यानुसार पहिल्या लाटेतही अशा अनेक रूग्णांना घरी राहून उपचार मिळाले. त्यामुळे रूग्णालयांवरचा ताण कमी झाला.
आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरूवात शिमगोत्सवासाठी आलेल्या मुुंबईकरांमुळे वाढली आहे. मार्च महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून भरमसाठ रूग्ण वाढू लागले आहेत. यापैकी काहींना अजिबातच लक्षणे नाहीत किंवा साैम्य लक्षणे आहेत. त्यामुळे त्यांना घरीच उपचार सुरू आहेत. मात्र, ज्यांच्यामध्ये अजिबात लक्षणे नाहीत, असे रूग्ण बाहेर फिरताना दिसत आहे. लक्षणे असलेल्या रूग्णांकडूनच इतरांना संसर्गाचा धोका जास्त आहे. दुसऱ्या लाटेत तर हा धोका अधिक वाढला आहे. त्यामुळे ज्यांनी चाचणी केलेली नाही, अशा लक्षणे नसलेल्यांमुळे कोरोनाचा फैलाव अधिक झाला आहे.
ज्यांच्या चाचण्या झाल्या आहेत आणि जे होम आयसोलेशनमध्ये आहेत, त्यांच्यात कोणतीच लक्षणे दिसत नसल्याने अशा व्यक्तींपैकी काही व्यक्ती बाहेर फिरत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे सध्या अशांकडूनही संसर्गाचा धोका वाढला आहे. जिल्ह्यात आता एकूण रूग्णसंख्या १५,८८९ इतकी असून त्यापैकी २०३७ रूग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी ८८६ रूग्ण हे होम आयसोलेशनमध्ये आहेत. दिवसागणिक रूग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे. यात अजिबात लक्षणे नसलेल्या किंवा कमी लक्षणे असलेल्या रूग्णांची होम आयसोलेशनमध्ये अधिकच भर पडत आहे.