रत्नागिरी : वाढत्या तापमानामुळे शेतकरी आधीच हवालदिल झाले असताना अचानक हवामानात बदल झाल्याने रविवारी सकाळी पावसाळा सदृश्य वातावरण तयार झाले होते. हवामान खात्याने वादळी वारे व पावसाचा इशारा दिल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.यावर्षीचा आंबा हंगाम आर्थिकदृष्ट्या संकटात आहे. पुनर्माेहोर, थ्रीप्स, तुडतुड्यामुळे आंबा पीक धोक्यात आले आहे. मार्चपासून किरकोळ आंबा बाजारात येथे सुरू झाले असले तरी गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी पीक निम्यापेक्षा कमी आहे. आंब्याला दरही नसल्याने शेतकऱ्यांना खत व्यवस्थापनापासून आंबा काढणीपर्यंत होणारा खर्च निघणे अवघड झाले आहे. गेले दोन दिवस रत्नागिरीचे कमाल तापमान सुमारे ३४ अंश असले तरी शनिवारी सायंकाळी आभाळ दाटून आले होते. रविवारी पाऊस केव्हाही कोसळू शकतो, असे वातावरण तयार झाले होते. मात्र दुपारनंतर हे वातावरण थोडेफार निवळले.सध्या वाशी मार्केटमध्ये ८०० ते २००० रूपयांपर्यंत पेटीला दर देण्यात येत असला, तरी खर्च जावून शेतकºयांच्या हाती काहीच येत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे. त्यातच कँनिंग व्यवसाय सुरू झाला असून, आंबा किलोवर खरेदी केला जात आहे. कॅनिंगसाठी २५ रूपये किलो दराने आंबा खरेदी करण्यात येत आहे. शनिवारी कोकणातून ७५ हजार व अन्य राज्यांतून २५ हजार पेट्या विक्रीसाठी वाशी मार्केटमध्ये आल्या होत्या. बदलत्या हवामानाचा फटका कोकणातील आंबा पिकाला बसल्याने उत्पादनामध्ये कमालीची घट झाली आहे. कोकणातील आंब्याची आवक गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी निम्मीच आहे. उत्पादन कमी असतानाच दरही घसरले आहेत. गत दहा वर्षांच्या तुलनेत यावर्षी पहिल्यांदाच हापूसची आवक निम्म्यावर झाली आहे.पहिल्या टप्प्यातील आंबा संपला असून, दुसºया टप्प्यातील आंबा किरकोळ आहे. तिसºया टप्प्यातील आंबा थ्रीप्सने ओरखडल्यामुळे त्याचे बाजारात येण्याचे प्रमाण अत्यल्प राहणार आहे. त्यामुळे हा आंबा शेतकºयांना किलोवर द्यावा लागणार आहे. मात्र, किलोचेही दर कमी असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
वातावरणापुढे शेतकऱ्यांनी टेकले गुडघे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 11:25 PM