रत्नागिरी : शहरातील शिवाजीनगर भागात मुख्य रस्त्याला गटार आहे; परंतु शिवाजीनगरहून मारुती मंदिराकडे येणाऱ्या मर्गावर डाव्या बाजूला गटार नसल्याने पाणी रस्त्यावर साचत आहे. यामुळे रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले आहे. त्यामुळे साचलेल्या पाण्यातून गाडी गेली की पादऱ्यांची या पाण्याने आंघोळच होत आहे. पाण्याचा निचरा होण्यासाठी तत्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.
मुसळधार पाऊस
देवरूख : संगमेश्वर तालुक्यात शनिवारपासूनच पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे तालुक्यात अनेक भागात नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून, पूरस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील शास्त्री नदीचे पाणी वाढल्याने संगमेश्वर बाजारपेठ आणि माखजन बाजारपेठेत पुराचे पाणी शिरले आहे.
रोटरीतर्फे वृक्षारोपण
खेड: लोटे रोटरी रोट्रॅक्ट व इनरव्हील क्लबतर्फे वृक्षारोपण करण्यात आले.लोटे-खरवलीवाडी येथे २५ झाडांची रोपे लावण्यात आली. याप्रसंगी रोट्रॅक्टचे अध्यक्ष तुषार खताते, रोटरीचे अध्यक्ष सुभाष रहाटे, आनंद कोळवणकर, इनरव्हील क्लबच्या रहाटे, मंदार दिवेकर, शुभम काते, प्रणय काते उपस्थित होते.
प्राथमिक शिक्षक कार्यकारिणीची सभा
दापोली : अखिल महाराष्ट्र प्राथमिक संघाची दापोली कार्यकारिणी सभा जिल्हाध्यक्ष प्रवीण काटकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी खेड तालुकाध्यक्ष सु. रा. पवार, सचिव अविनाश साळुंके, जिल्हा सरचिटणीस संतोष देवघरकर, विठ्ठल भिसे, महिला आघाडीप्रमुख मानसी सावंत, आरोही शिवगण, मुग्धा सरदेसाई उपस्थित होते.
जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
खेड: तालुक्यातील किंजळेतर्फे नातू गावठण, कळकरायवाडी, नवीवाडी, धनगरवाडी येथील कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तूंसह छत्र्यांचे वाटप करण्यात आले. यासाठी तुकाराम निकम, पार्वती निकम, सुशांत निकम, सुखदेव गायकवाड आदींचे सहकार्य लाभले. पोलीसपाटील यशवंत निकम, मोहन निकम, विठोबा मोरे, एकनाथ निकम, गजानन मोरे, नितीन जाधव उपस्थित होते.
बाल झुंबड स्पर्धेत यश
खेड : मुंबईतील अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय ऑनलाइन बाल झुंबड स्पर्धेत खेड येथील ज्ञानदीप विद्यामंदिरमधील चाैथीत शिकणाऱ्या श्रीमयी दाबके हिने यश प्राप्त केले आहे. या स्पर्धेत राज्यातील बहुसंख्य स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. बाल वयोगटासाठी बाल झुंबड स्पर्धेत श्लोक-प्रार्थना बालगीत व पंचतंत्रातील एक गोष्ट असे तीन प्रकार घेण्यात आले.
पूर्णाकृती पुतळा भेट
चिपळूण : काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरास राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पूर्णाकृती पुतळा भेट म्हणून देण्यात आला. या पुतळयाचे अनावरण २६ जुलै रोजी करण्यात येणार आहे. महात्मा गांधींचा पूर्णाकृती पुतळा वाचनालयाचे कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे यांच्यकडे भेट स्वरुपात दिला आहे.
८० टक्के भात लावणी पूर्ण
राजापूर : गेले ९ ते १० दिवसांपासून पावसाने दडी मारल्यानंतर पाचल परिसरातील शेतीची कामे ठप्प झाली होती. मात्र दोन दिवसांपासून परिसरात जोरदार पाऊस पडत असल्याने भात लावणीला वेग आला आहे. आतापर्यंत ८० टक्के लावणी पूर्ण झाली आहे. मध्यंतरीच्या काळात पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतित होता. पाऊस असाच राहिल्यास लवकरच १०० टक्के लावणी पूर्ण होण्याचा अंदाज आहे.
संहितालेखन कार्यशाळा
लांजा : थील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मराठी विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने १६ व १७ जुलै रोजी संहितालेखन या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. सध्या तंत्रज्ञानावर आधारित कौशल्य विकास शिक्षणाकडे अधिक कल आहे. त्यामुळे महाविद्यालयाच्या वतीने संहितालेखन कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.