टेंभ्ये : जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्न जुलैअखेर निकाली काढणार असल्याचे शिक्षणाधिकारी राजेंद्र अहिरे यांनी सांगितले.जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाच्या धरणे आंदोलनादरम्यान उपस्थित केलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. जिल्ह्यात माध्यमिक शिक्षकांचे काही प्रश्न शिक्षणाधिकारी कार्यालयात प्रलंबित आहेत. याबाबत धरणे आंदोलनादरम्यान प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.सध्या अनेक वैद्यकीय देयके, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक मान्यता, पेन्शन समस्या याबरोबरच अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. शिक्षणाधिकाऱ्यांसमोर जिल्हाध्यक्ष भारत घुले, कार्यवाह अशोक आलमान, सहकार्यवाह आत्माराम मेस्त्री व उपस्थित प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्या. प्रलंबित प्रश्न तत्काळ सोडवावेत अन्यथा अध्यापक संघाला आंदोलन अधिक तीव्र करावे लागेल, असे मत जिल्हाध्यक्षांनी व्यक्त केले. कार्यालयात कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात कमतरता होती. यामुळे काही प्रश्न प्रलंबित राहिले असल्याचे शिक्षणाधिकारी अहिरे यांनी मान्य केले. सध्या जिल्हा परिषदेकडून परिपूर्ण कर्मचारीवर्ग नेमल्यामुळे जुलै महिन्याच्या अखेर सर्व प्रलंबित प्रश्न निकालात काढणार असल्याचे स्पष्ट केले. समस्या सोडवण्याबाबत कोणताही दुजाभाव कार्यालयाकडून केला जाणार नाही. आलेल्या क्रमानेच समस्या सोडवल्या जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.संचमान्यता अंमलबजावणीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. याबाबत कोणती कार्यवाही करायची, यासंदर्भात शिक्षण संचालक, पुणे यांनी सभा लावली आहे. या सभेत पुढील चित्र स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले. सध्या नववी व दहावीच्या वर्गांच्या संख्येबाबत निर्णय घेण्यासाठी राज्यस्तरावर समिती स्थापन केली आहे. त्यांच्या शिफारशीनुसार नववी, दहावीची संचमान्यता होईल. पाचवी ते आठवीपर्यंतची संचमान्यता मात्र आरटीईच्या निकषाप्रमाणेच होईल, असे राजेंद्र अहिरे यांनी स्पष्ट केले. (वार्ताहर)
प्रलंबित प्रश्न जुलैअखेर निकाली काढणार
By admin | Published: July 15, 2014 11:38 PM