लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : निराधारांना आर्थिक मदत व्हावी, या उद्देशाने केंद्र सरकारकडून विशेष सहाय्य योजनेतून अशा निराधार व्यक्तींना प्रत्येक महिन्याला एक हजार रुपयांचे अर्थसहाय दिले जाते. येथील कुष्ठरुग्ण वसाहतीतील १९ लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे. शासनाकडून गेल्या चार महिन्यांचे अनुदान पोस्टात येऊनही त्याचे वाटप करण्यासाठी पोस्टमन या वसाहतीकडे वळलेच नसल्याने या लाभार्थ्यांची उपासमार होऊ लागली आहे. त्यामुळे यापैकी काही वृद्धा वसाहतीच्या परिसरात भीक मागून उदरनिर्वाह करीत आहेत.
शहरानजीकच्या उद्यमनगर परिसरातील कुष्ठरुग्ण वसाहतीत सुमारे २० निराधार स्त्री - पुरूष राहतात. यापैकी सुमारे १५ महिला असून यात काही विधवा व वृद्ध आहेत. यापैकी सात जणी ७० वर्षांवरील आहेत. हे रुग्ण बरे होऊनही त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना न स्वीकारल्याने वर्षानुवर्षे या व्यक्ती या वसाहतीतच रहात आहेत. त्यांना केंद्र तसेच राज्य सरकारच्या विशेष सहाय्य योजनेअंतर्गत संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, वृद्धापकाळ आदी योजनांमधून महिन्याला १००० रुपये अनुदान दिले जात आहेत. कोरोना काळात काही महिने त्यांचे वेतन अनियमित झाले होते. मात्र, आता नोव्हेंबर, डिसेंबर २०२० ते जानेवारी, फेब्रुवारी २०२१ असे चार महिन्यांचे त्यांचे वेतन पोस्टात जमा झाले आहे.
या रुग्णांना पोस्टाच्या घरपोच सेवेचा लाभ मिळावा, यासाठी यापैकी काही रुग्णांचे पोस्टातील खाते पोस्ट पेमेंटस बँकेत रूपांतरीत करण्यात आली आहेत. हे रुग्ण दुर्धर व्याधीग्रस्त असल्याने ते पोस्टात किंवा या बँकेत जात येत नाहीत. ही त्यांची समस्या लक्षात घेऊन तहसीलदार शशिकांत जाधव यांनी या लाभार्थ्यांचे पैसे पोस्टात जमा होताच ते तातडीने त्यांना घरपोच करावे, असे पत्र रत्नागिरीतील पोस्ट पेमेंट बँक तसेच डाकघर अधीक्षक, पोस्टमास्तर यांना १० डिसेंबर २०२० रोजी दिले आहे. या पत्रासोबत या लाभार्थ्यांची यादीही आहे.
मात्र, या लाभार्थ्यांचे नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंतचे चार महिन्यांचे अनुदान पोस्टात तसेच पोस्ट पेमेंटस बँकेत येऊनही ते या वसाहतीकडे अद्याप पोस्टमनच न फिरकल्याने या लाभार्थ्यांना भीक मागून उदरनिर्वाह करण्याची वेळ आली आहे. आजारी पडल्यास उपचारासाठीही त्यांच्याकडे पैसे नाहीत.
कोट
कुष्ठरूग्ण वसाहतीतील रुग्णांना विशेष योजनेचे पैसे घरपोच करण्यासंदर्भात १० डिसेंबर २०२० रोजी तहसीलदार यांनी लाभार्थ्यांच्या यादीसह पोस्टाला तसेच पोस्ट पेमेंट बँकेला पत्र दिले आहे.
खेडेकर, नायब तहसीलदार, संजय गांधी निराधार योजना विभाग, रत्नागिरी
चौकट
पोस्ट पेमेंटस बँकेत असलेले पैसे या लाभार्थ्यांना घरपोच नेऊन देण्यासाठी त्यांच्या वेतनाच्या रकमेतून पोस्टमन यांना २५ रुपये देण्याची तरतूद आहे. पोस्टात आलेले वेतन मात्र त्यांनी विनाशुल्क या लाभार्थ्यांना पोहोच करायचे आहे. प्रशासनाकडून या रुग्णांसाठी सुविधा देऊनही पोस्टाकडून असंवेदनशीलता दाखविली जात आहे.