दापोली / शिवाजी गोरे : निसर्ग आणि ताैक्ते वादळात उद्ध्वस्त झाल्यानंतर स्वत:चे घर सावरण्याचे कठीण आव्हान दापाेली तालुक्यातील आंजर्ले गावातील नुकसानग्रस्तांसमाेर आहे; मात्र असे असले तरीही स्वत:चा संसार सावरता सावरता दुसऱ्याचा संसार उभा करण्याचे औदार्य गावातील ग्रामस्थांनी दाखविले आहे. वादळातून सावरलेल्या या गावातील ग्रामस्थांनी चिपळूण आणि महाड येथील पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे.
गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून लाखो रुपये गोळा केले. त्यातून पूरग्रस्तांना जेवणापासून, टिकणारे खाद्य पॅकेट्स, लहान मुलांचे कपडे, बाटल्या, घर साफसफाईसाठी लागणारे साहित्य, तसेच विविध प्रकारच्या कपड्यांची मदत देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे. सावणेकरीण देवी आपत्ती व्यवस्थापन समिती आंजर्लेतर्फे चिपळूण व महाड येथील पूरग्रस्तांना कोणत्याही वस्तू रूपाने किंवा कमीत कमी १०० रुपये आर्थिक रूपाने आपण मदत करू शकता, असे आवाहन करण्यात आले हाेते. या आवाहनाला ग्रामस्थांनी प्रतिसाद देत मदत जमा करण्यात आली. तसेच मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत गोळा झाली. त्यामुळेच या गावाने चिपळूण आणि महाड या दोन्ही शहरातील व ग्रामीण भागातील लोकांना मोठ्या प्रमाणात मदतीचा हात दिला आहे.
एकीकडे आंजर्ले हे गाव दोन चक्रीवादळाने उद्ध्वस्त झाले असतानाही या गावाने मोठ्या हिमतीने पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. आंजर्ले गावातील प्रत्येक वाडीतील नागरिकांनी प्रत्येक कुटुंबाकडून शंभर रुपयाची मदत गोळा करून त्याचा योग्य पद्धतीने विनियोग केला आहे. गावातील आपत्ती व्यवस्थापन कमिटीने जीवनावश्यक वस्तूचे किट बनवून लोकांना घरपोच उपलब्ध करून दिले आहेत. मदतीचा हात देताना गरीब व गरजवंतांना ही मदत कशी पोहोचेल यादृष्टीने नियाेजन करून त्या त्या गावात जाऊन लोकांना ही मदत दिली आहे.
------------------------
दापाेली तालुक्यातील आंजर्ले येथील सावणेकरीण देवी आपत्ती व्यवस्थापन समितीतर्फे पूरग्रस्तांना मदत देण्यात आली.