रत्नागिरी : रत्नागिरी शहरासहीत परिसरातील ९ गावांमध्ये आता पाणीबाणी निर्माण झाली आहे. शीळ धरणात अवघा सोळा टक्के साठा उरल्याने रत्नागिरी शहरात बुधवारपासून दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे.
एमआयडिसीच्या धरणांमधील पाणी साठाच संपुष्टात आल्याने १३ जूनपासून दोन दिवसाआड केवळ ५० टक्के पाणी पुरविले जाणार आहे. त्यामुळे नगर परिषद क्षेत्र व ९ ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील टंचाई स्थिती ही आगीतून फुफाट्यात अशी झाली आहे. पाऊस अधिक लांबल्यास परिस्थिती स्फोटक होण्याची भीती आहे.रत्नागिरी नगर परिषदेची नळपाणी योजना जुनाट झाली आहे. नवीन योजनेचे काम सुरू असून ते पूर्ण होण्यास अजून वर्षभराचा कालावधी जाणार आहे. शहराला पाणी पुरवठा करणारे पानवल हे दुसरे धरण फेब्रुवारी महिन्यातच आटले आहे. शीळ धरणात केवळ १६ टक्के पाणी साठा आहे. पाऊस लांबण्याची शक्यता असल्याने हा साठा संपल्यास शहरातील पाणी पुरवठ्यावर त्याचा गंभीर परिणाम होणार आहे.त्यामुळेच शहरात १२ जूनपासून दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे. शहराचे दोन विभाग करून प्रत्येक विभागाला एक दिवसाआड पाणी दिले जाणार आहे. निवखोल, राजिवडा, बेलबाग, गवळीवाडा, चवंडेवठार, घुडेवठार, मांडवी, संपूर्ण बाजारपेठ, वरची आळी, आठवडा बाजार, टिळक आळी, झाडगाव, मुरुगवाडा, खालची आळी, पेठकिल्ला, मिरकरवाडा, कीर्तीनगर, कोकणनगर फेज नं.४ या भागात १२ जून रोजी नळाला पाणी येणार आहे.रत्नागिरी शहराच्या दुसऱ्या विभागातील पोलीस लाईन, वरचा फगरवठार, तांबट आळी, राहुल कॉलनी, आंबेडकरवाडी, सन्मित्रनगर, माळनाका, एस.व्ही.रोड, मारूती मंदिर, हिंदू कॉलनी, थिबा पॅलेस, विश्वनगर, आनंदनगर, अभ्युदयनगर, नूतननगर, नरहर वसाहत, उद्यमनगर, शिवाजीनगर, साळवी स्टॉप, छत्रपतीनगर, सहकारनगर, विष्णूनगर, नवलाईनगर, चार रस्ता मजगाव रोड, स्टेट बॅँक कॉलनी, म्युन्सिपल कॉलनी, राजपूरकर मार्ग व एकता मार्ग या भागात १३ जून रोजी नळाला पाणी येणार आहे.
पाण्याची टंचाई व संपत आलेला शीळ तसेच एमआयडिसीच्या धरणातील अत्यल्प साठा पाहता पाऊस लवकर आला नाही तर टंचाईने सर्वांचीच होरपळ होणार आहे.गृहसंकुल बांधकामांसाठी पाण्याचा वारेमाप वापररत्नागिरी शहरातील तसेच परिसरातील ९ ग्रामपंचायतींमधील नागरिक पाण्यासाठी टाहो फोडत असताना रत्नागिरी शहर तसेच परिसरातील गावांमध्ये काही ठिकाणी गृहसंकुलांच्या बांधकामांसाठी वारेमाप पाण्याचा वापर केला जात आहे. सामान्यांना विकतचा पाणी टॅँकर चार दिवसांनीही उपलब्ध होत नसताना या बांधकामांकरिता मात्र मोठ्या प्रमाणात पाणी मिळत आहे.
पाण्यासाठी टाहो फोडणाऱ्या जनतेची तहान महत्वाची की बांधकामांसाठी वारेमाप पाण्याचा वापर महत्वाचा असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. पाणी टंचाई काळात बांधकामांना तात्पुरती स्थगिती का देण्यात आली नाही. तसे केल्यास निदान बांधकामासाठी वापरले जाणारे पाणी जनतेला मिळू शकेल व त्यांची तहान भागू शकेल, असे मत जनतेमधून व्यक्त केले जात आहे.