रत्नागिरी : पर्ससीननेट मासेमारीचे आता या हंगामातील शेवटचे दाेन दिवस बाकी आहेत. त्यामुळे पर्ससीननेट नौका मालकांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. खलाशांच्या वेतनासह बँकेकडून घेतलेल्या लाखो रुपयांच्या कर्जाचे हप्ते कसे भरणार, असा प्रश्न त्यांना सतावत आहे.जिल्ह्यात २८० पर्ससीननेट नौका आहेत. पर्ससीननेट मासेमारी १ सप्टेंबरपासून सुरू होते. त्यांना मासेमारी करण्याची केवळ ३१ डिसेंबरपर्यंतच परवानगी देण्यात आली आहे. केवळ चारच महिने या नौकांना मासेमारी करता येते. त्यामुळे उर्वरित महिने नौका किनाऱ्यावर नांगराला बांधून ठेवाव्या लागतात. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेली पर्ससीननेट मासेमारी बंद झाल्यानंतर त्याचा परिणाम जिल्ह्यातील बाजारपेठेवर होतो.
मासेमारीचा चार महिन्यांचा कालावधी
यंदाही अपेक्षेप्रमाणे मासेमारी झालेली नाही. अनेक वादळ वाऱ्यांमुळे मासेमारी बंद ठेवावी लागली होती. त्यामुळे पर्ससीननेट मासेमारीला चार महिने परवानगी देण्यात आलेली असली तरी प्रत्यक्षात अडीच ते तीन महिनेच मासेमारीचा कार्यकाळ मिळतो. त्यामुळे मच्छिमारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते.
डिझेलचा खर्चही भागेनाइंधनाचे भाव वाढल्याने डिझेलच्या खरेदीवर हजारो रुपयांची वाढ झालेली आहे. त्याचबरोबर चांगल्या प्रतीचे मासे मिळत नसल्याने डिझेलचा खर्चही भागेनासा झालेला आहे. त्यातच खलाशांचे वाढलेले वेतन अदा करताना नौका मालकांना नाकीनऊ येत आहेत.
अनामत रकमांचे कायदि. १ जानेवारीपासून पर्ससीननेट मासेमारी बंद राहणार असल्याने खलाशांनाही बसवून त्यांचा खर्च करावा लागणार आहे. त्यातच अनेक खलाशांनी लाखो रुपये अनामत रकमेपोटी घेतले आहेत. काम नसल्याने ते खलाशी निघून गेल्यास लाखो रुपये वसूल कोणाकडून करणार, अशी चिंता मालकांना सतावत आहे.
इतर मासेमारीप्रमाणेच परवानगीची मागणीपर्ससीननेट मासेमारीवर जिल्ह्यातील इतर व्यवसाय अवलंबून आहेत. पर्ससीननेट मासेमारी बंद झाल्यानंतर टेम्पो, रिक्षा, व्यापारी, मासे कापणाऱ्या महिला, प्रक्रिया करणारे कारखाने, बाजारपेठ आदी व्यवसायांवर कुऱ्हाड कोसळते. या व्यवसायावर जिल्ह्यातील लाखो लोकांच्या संसाराचा गाडा चालत असल्याने इतरांप्रमाणेच संपूर्ण मासेमारी माेसमात मच्छिमारी करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी त्यांची मागणी आहे.