मनोज मुळयेमन्या : काय भाऊ, कसं वाटतंय आता?बन्या : काय राव. आधीच खूप टेन्शन आलंय. वाटलं होतं काय आणि झालंय काय, हेच समजत नाहीये. त्यात जखमेवर मीठ चोळताय का?मन्या : आता आमचे दिवस आलेत. कोकण हा आमचाच बालेकिल्ला होता आणि आमचाच बालेकिल्ला आहे. बाकी कोणीही फक्त आपणच कोकणचे नेते असल्याचा आव आणू नये.बन्या : हे मात्र चुकीचं बोलताय हा. आमच्या नेत्यानेच कोकणाचं रूप बदललंय. त्यांनी लावलेल्या झाडाची फळंच खाताय तुम्ही.मन्या : त्यांनी झाड लावलं आणि वाढवलं. हे मान्य आहे. पण नंतर काय केलं? तेच झाड तोडून टाकायचा प्रयत्न केला ना. फांद्या छाटून टाकल्या. आता कोकणातल्या लोकांनीच त्या झाडाला पाणी घालून ते झाड परत टवटवीत केलंय.बन्या : सगळा कोकण प्रांत तुमचा बालेकिल्ला ना? मग त्या उत्तरेकडच्या परगण्यात काय झालं? तिथले सरदार माघारी का गेले? तिथे तुमचा किल्ला ढासळलाच ना?मन्या : आता विषय उत्तरेकडे नेऊ नका. तिकडे शेकापमुळे तटबंदी मजबूत झाली. दक्षिण कोकणचं आधी बोला. निवडणुका सुरू झाल्यापासून मारे खूप हवा केली होतीत. हा फोडला. तो फोडला. हा आमच्या बाजूने आला. तो आमच्या बाजूने आला. बरीच हवा केलीत ना भाऊ? कुठे गेली ती? विरली?बन्या : हवा सगळेच करतात. रत्नांग्रीत म्हणे तुम्ही एक लाखाचे मताधिक्य घेणार होतात. लाखाचे खाक झालेच ना. प्रचार सुरू असताना अशी हवा करावीच लागते. पण एक खरं आहे राव. फसलोच आम्ही. अहो आमच्या सिंधुुर्गात फसलो आम्ही. मग रत्नांग्रीचे काय घेऊन बसलात? लोक बोलतात एक आणि करतात दुसरेच. या लोकांना खऱ्या-खोट्याची ओळखच नाही. आम्ही या लोकांसाठी आता काहीच करणार नाही. पण त्याची कोणाला फिकीर आहे का? आता आमचं ठरलंय नो विकास... निवडणुकीत सगळंच होतं भकास.मन्या : हे काय ‘आठवले’ मध्येच तुम्हाला? अहो विकास केला तेव्हा पद दिलेच तुम्हाला लोकांनी. पण भाकरी परतावी लागतेच. लोकांना तुमच्या जागा दिसतात, ऐश्वर्य दिसतं. लोकांना वाटतं की तुम्ही हे सगळे राजकारणातून कमावलंय. मग लोक बिथरतात. त्यामुळे भाकरी परतावी लागतेच. उत्तर कोकणात भाकरी परतली गेलीच. आणि तुम्हाला एक बोली भाषेतील म्हण माहिती आहे का? चहापेक्षा किटली गरम. म्हणजे आसपासची माणसेच जास्त आक्रमक आहेत. सर्वसामान्य लोकांना चहाच्या आधी किटलीच बघायला मिळते. या किटलीला जनता विटली आहे आता.बन्या : बरोबर असेल तुमचं. अनेक लोक आमच्या नेत्यांपर्यंत पोहोचतच नाहीत. ही आसपासची माणसं नेत्यांच्या कानात काय-काय बोलतात आणि त्यातून सर्वसामान्य माणूस आमच्या नेत्यांपासून दुरावतो. आता याला करणार तरी काय?मन्या : यावर एकच करायला हवंय. जनतेला गृहीत धरू नका. तुम्ही खूप केलंय. पण दिवसेंदिवस लोकांच्या समस्या वाढत आहेत. त्यांना दिलासा मिळेल, असे काम व्हायलाच हवे. आमचा नेता आपल्या कार्यकर्त्यांमुळे तळागाळात पोहोचलाय. लोकांची सुखदु:ख समजून घेत तो मतदारांशी नम्रपणे वागतो. जाहीर भाषणे करताना कुणाची किती लग्न झालीत, कुणाच्या घरात काय चाललंय यावर बोलतच नाही. जनतेच्या प्रश्नासाठी आक्रमक व्हायचं सोडून नुसत्या सभांमध्ये दुसºया पक्षातल्या लोकांच्या कुटुंबात काय चाललंय, याची बोंब मारून मते कशी मिळतील? असं लोकांना गृहीत धरलं ना, म्हणूनच मतदारांनी एका आंब्याचा गोड मुरांबा केला आणि एका आंब्याचं लोणचं केलं. आता तरी सावध व्हा.
लोणचं अन् मुरांबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 8:10 PM