गुहागर : महाविकास आघाडी सरकारने आत्मनिर्भर भारत योजनेतील काही योजना चोरुन पिकेल ते विकेल ही योजना सुरु केली आहे. या योजनेतील सर्व लाभ आत्मनिर्भर भारतमधूनच देण्यात येणार आहेत, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अतुल काळसेकर यांनी केले. त्यांनी लिहिलेल्या ह्यनीलक्रांतीह्ण या पुस्तकाचे प्रकाशन गुहागरमध्ये झाले, यावेळी ते बोलत होते.जागतिक मत्स्यदिनानिमि काळसेकर यांच्या ह्यनीलक्रांतीह्ण या पुस्तिकेचे प्रकाशन गुहागर येथे भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्ह्याध्यक्ष डॉ. विनय नातू यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी अतुल काळसेकर म्हणाले की, आपल्याकडे कोणत्याही योजनेला विरोध करण्याची प्रवृत्ती आहे किंवा ती योजना आपल्यासाठी नाहीच, अशी आपली मानसिकता आहे. त्यामुळे योजनांचे क्रियान्वयनाचे प्रमाण अत्यल्प आहे.
प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना २०२०-२५ ही मच्छिमारांचे जीवन बदलून टाकणारी योजना आहे. कोकणात मत्स्यव्यवसाय करणाऱ्या सर्वांसाठी काही ना काही उद्योग निर्मितीची संधी या योजनेत दिली आहे. मात्र, आपल्याकडे योजनाच समजत नाहीत. म्हणूनच या पुस्तकाची निर्मिती केल्याचे काळसेकर म्हणाले.यावेळी मच्छीमार नेते विठ्ठल भालेकर यांनी योजना येतात पण आर्थिक सहाय्य करण्यास बँक तयार होत नसल्याची खंत मांडली. भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू म्हणाले की, बँक नाही म्हणते म्हणून प्रस्ताव करायचे थांबू नका. अनेक प्रस्ताव तयार होऊ द्या. मग बँक नाही म्हणाली तर त्यांना तयार कसे करायचे हे आम्ही पाहू, असे सांगितले. या कार्यक्रमाला जिल्हा सरचिटणीस सुरेश सावंत, रामदास राणे, आशिष जोगळेकर, ॲड. मिलिंद जाडकर, तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे उपस्थित होते.