असगोली : गुहागर तालुक्यातील निगुंडळ येथील खडी क्रशरवर उभ्या असलेल्या पोकलेनचे सुमारे ७ लाखांचे १० पितळी पिस्टन चोरल्याप्रकरणी रुपकिशोर महतो (२३) याला गुहागर पोलिसांनी इस्लामपूर (ता. वाळवा, जि. सांगली) येथून अटक केली आहे. ही चोरीची घटना घडल्यावर बेपत्ता झालेल्या किशोर महतो याचा शोध पोलीस घेत होते. दरम्यान, ही चोरी पगाराचे पैसे न दिल्याने मालकाला अद्दल घडविण्यासाठी महतो बंधूंनी केली होती. चोरीचे पिस्टन कुठेही न विकता पुणे येथे त्यांनी लपवून ठेवले होते, असे चौकशीत समोर आले आहे.आनंद जगदाळे (रा. पेडगाव, ता. खटाव, जि. सातारा) यांनी त्यांचा पोकलेन अवधूत सुशील वेल्हाळ यांच्या निगुंडळ येथील खडी क्रशरवर भाड्याने दिला होता. हा पोकलेन चालविण्याचे काम किशोर महतो (मूळ गाव आंबो, ता. परखंड, जि. हजारीबाग, झारखंड) करत होता. १९ जानेवारी रोजी रात्री ११.३० वाजता किशोर महतो हा दोन्ही मोबाईल स्वीच ऑफ करुन कामगार राहात असलेल्या ठिकाणाहून बेपत्ता झाला होता.
२० जानेवारी रोजी जगदाळे यांनी खडी क्रशरवर जावून पोकलेनची पाहणी केली असता, कंट्रोल व्हिल आणि स्विंग बेअरिंग खोलून त्यातील जेसीबी कंपनीचे १० पितळी पिस्टन चोरल्याचे लक्षात आले. या संदर्भात गुहागर पोलीस स्थानकात तक्रार नोंदवताना जगदाळे यांनी त्यांचा चालक किशोर महतोवर संशय घेतला होता.या घटनेचा तपास पोलीस अंमलदार हनुमंत नलावडे हे पोलीस निरीक्षक अरविंद बोडके, सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. के. जाधव यांचे मार्गदर्शनाखाली करत होते. हनुमंत नलावडे यांनी किशोर महतोच्या मोबाईल कॉल्सची तपासणी केली. त्यामध्ये किशोरचा भाऊ रुपकिशोर महतो हा १९ जानेवारीच्या रात्री निगुंडळ परिसरात आल्याचे लक्षात आले.
या माहितीवरुन गुहागर पोलिसांना रुपकिशोर महतो हा सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे असल्याचे समजले. हनुमंत नलावडे, पोलीस कॉन्स्टेबल राजू कांबळे, सचिन पाटील यांनी ५ फेब्रुवारी रोजी इस्लामपूरला जात रुपकिशोर महतोला अटक केली.किशोर महतो याला जगदाळे यांनी काही महिन्यांचा पगार दिला नव्हता. ही गोष्ट त्याने भावाला सांगितली. त्यानंतर मालकाला अद्दल घडविण्यासाठी पोकलेनचे पार्ट काढून ठेवण्याचा कट शिजला. त्याप्रमाणे रुपकिशोर महतो निगुंडळला आला. दोघांनी पोकलेन खोलून त्यातील किमती पिस्टन काढले. पोलीस उपनिरीक्षक दीपक कदम आणि त्यांच्या टीमने फुरसुंगी येथून हे पितळी पिस्टन ताब्यात घेतले.