सागर पाटील/टेंभ्ये : कोकण व पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा महत्त्वपूर्ण घाट म्हणून आंबा घाटाकडे पाहिले जाते. गेल्या काही वर्षांपासून या घाटामध्ये सातत्याने भूस्खलनाचे प्रकार हाेत आहेत. सध्या साखरप्यापासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या बाजूलाच एक मोठा खड्डा तयार झाला आहे. या खड्डय़ाचे स्वरूप पाहता हा भूस्खलनाचा प्रकार असावा, अशी शक्यता प्रवाशांमधून व्यक्त केली जात आहे. हा खड्डा बरोबर वळणावर रस्त्याच्या बाजूला असल्याने जीवघेणा ठरू शकतो.
या घाटातून होणारी वाहतूक ही अन्य घाटमार्गांच्या तुलनेत अधिक आहे. परंतु, गेल्या काही वर्षांपासून या घाटात भूस्खलनाचे प्रकार घडत आहेत. सध्या साखरप्यापासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर जवळपास एक ते सव्वा फूट व्यास असणारा व दाेन ते अडीच फूट खोलीचा एक खड्डा तयार झाला आहे. या खड्डय़ाचे स्वरूप पाहता हा भूस्खलनाचा प्रकार असण्याची शक्यता प्रवाशांनी व्यक्त केली आहे. सध्या अडीच ते तीन फूट व्यास असणारी जमीन खचली आहे. परंतु, या खड्ड्याशेजारची जमीन अजून खचणार आहे का, याबाबत बांधकाम खात्याने लक्ष देणे आवश्यक आहे. तसे झाले तर या महामार्गावर मोठा अनर्थ होऊ शकतो. सध्या निर्माण झालेला खड्डाही वाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काही वर्षांपूर्वी या घाटामधील कठडा कोसळल्याने अनेक दिवस घाटातील वाहतूक एकेरी करण्यात आली होती. सध्या या खड्ड्याच्या आजुबाजूची जमीन खचल्यास वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते.
--------------------------
रत्नागिरी - काेल्हापूर मार्गावरील आंबा घाटात रस्त्यावर माेठा खड्डा पडला असून, भूस्खलनाची शक्यता व्यक्त हाेत आहे. हा खड्डा धाेकादायक ठरत आहे. (छाया : सागर पाटील)