मेहरुन नाकाडे
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : पितृपंधरवडा सुरू असल्याने भाज्यांना वाढती मागणी आहे. परजिल्ह्यांतून आलेल्या भाज्यांचा बाजार समिती आवारात लिलाव झाल्यानंतर भाज्या शहरात व आसपासच्या गावात विक्रीसाठी येतात. लिलावावेळचे दर व प्रत्यक्ष विक्री यामध्ये मात्र प्रचंड तफावत आहे. नाईलाजास्तव ग्राहकांना दामदुप्पट किमतीने भाज्यांची खरेदी करावी लागत आहे.
पितृपंधरवड्यामुळे ‘म्हाळ’ घालण्याची प्रथा आहे. त्यावेळी जेवण देण्यात येत असल्याने या दिवसात भाज्यांचा विशेष खप होतो. भोपळ्याचा वापर भाजी बरोबर कोशिंबीर तसेच वड्यासाठी केला जात असल्याने भोपळ्याला विशेष मागणी आहे. भोपळ्यासह अन्य भाज्यांचाही खप वाढला आहे. बाजारात गावठी भाज्याही विक्रीसाठी येत आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीतील दर व प्रत्यक्ष बाजारातील दरात फरक असून, त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री बसत आहे. मात्र दरावर कोणाचे नियंत्रण नसल्याने ग्राहकांना विक्रेते सांगतील, त्या दराने भाज्या खरेदी कराव्या लागत आहेत. वड्यासाठी भोपळ्यासह काकडीचा वापर केला जात असल्याने मोठ्या काकड्यांचा खप वाढला आहे. मात्र, नगावर विक्री सुरू असून ३० ते ४० रुपये दराने काकडी विक्री सुरू आहे. चिबूड, हळदीची पाने, अळूची पाने यांनाही मागणी वाढली आहे.
इंधन दरात सातत्याने वाढ होत असून, हमालीसाठीही पैसे मोजावे लागत असल्याने विक्रीवर परिणाम होत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीपासून शहर व आसपासच्या भागात विक्रीसाठी जावे लागत असल्याने वाहतूक खर्च वाढत आहे. त्यामुळे साहजिकच लिलावच्या दरात विक्री करणे परवडत नाही.
- संतोष रेवाळे, रत्नागिरी
लिलावावेळी किमान दहा किलोच्या दरात भाज्यांची खरेदी करावी लागते. एकाच दिवशी भाज्या संपत नाहीत, नाशवंत माल असल्यामुळे भाज्या लवकर संपवाव्या लागतात अन्यथा भुर्दंड आम्हालाच बसतो. एकूणच वाहतूकखर्च, हमाली व अन्य खर्चाची सांगड घालूनच विक्री करावी लागत आहे.
- प्रशांत चव्हाण, खंडाळा
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दहा किलोच्या पटीत भाज्यांचा लिलाव होत असल्याने किरकोळ खरेदीसाठी बाजार समितीत जाणे शक्य होत नाही. त्यामुळे विक्रेते सांगतील तो दर देऊन भाज्यांची खरेदी करावी लागत आहे. दरावर शासनाचे नियंत्रण नसल्यामुळे आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
- सुहानी पाथरे, रत्नागिरी
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भाज्यांचा लिलाव झाल्यानंतर शहर व परिसरात भाज्यांची विक्री केली जाते. लिलावावेळचे दर व प्रत्यक्ष विक्री यामध्ये फरक पडतो. वाहतूक व अन्य खर्च वगळला तरी भाज्या दामदुप्पट किमतीने विकल्या जात असल्याने ग्राहक व शेतकरी यामध्ये भरडला जात आहे.
- वृषाली माेरे, कोतवडे
पालेभाज्यांची जुडी २५ ते ३० रुपये, माॅल, बाजार समितीत १० ते १२ रुपये दराने विक्री होते.
किलोवर भाेपळा स्वस्त आहे. किरकोळ भोपळ्याची शेड १० ते १५ रुपये दराने उपलब्ध आहे.
दोडके, पडवळ, दुधी भोपळे नगावर स्वस्त असले तरी किलोवर महाग पडत आहेत.