अरुण आडिवरेकर रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता जारी करण्यात आली आहे. आचारसंहितेमुळे एस्. टी. बसवर लावण्यात आलेले शासकीय योजनांचे फलक (पोस्टर) काढून टाकण्यात आले आहेत. त्याऐवजी आता मतदार नोंदणी करणारी पोस्टर्स लावण्यात आली आहेत. त्यामुळे गाड्यांवरील योजनांचे पोस्टर्स गेले असून, जागृतीचे फलक झळकू लागले आहेत.निवडणुकीची तारीख जाहीर होताच आचारसंहिता जारी करण्यात आली आहे. आचारसंहितेच्या काळात शासनाच्या कोणत्याही कामांची माहिती प्रसिद्ध करता येत नाहीत. तसेच शासनाच्या योजनांची माहिती देणारे फलक, पोस्टर्स, बॅनर तत्काळ हटविण्यात येतात. शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी एस्. टी. बसवर जाहिरातींचे पोस्टर्स चिकटविण्यात आले होते.
केंद्रशासनाच्या योजनांसह राज्यातील योजनांचाही यामध्ये समावेश होता. निवडणुकीची आचारसंहिता जारी होताच शासनाच्या या योजनांचे पोस्टर्स हटविण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार एस्. टी. महामंडळाने गाड्यांवर चिकटवलेले पोस्टर्स काढून टाकण्याच्या सूचना दिल्या होत्या. या सूचनेनुसार ही पोस्टर्स हटविण्यात आली आहेत. त्यामुळे आता योजनांची पोस्टर्स गाड्यांवर दिसून येत नाहीत.या पोस्टर्सऐवजी मतदार नोंदणी जागृतीची पोस्टर्स चिकटविण्यात आली आहेत. लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याची संधी गमावू नका, असा संदेश या पोस्टर्सवरून देण्यात आला आहे. तसेच मतदार नोंदणीसाठी मतदारांना आवाहन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त मतदारांनी आपली नोंदणी करून मतदानाचा हक्क बजवावा, असा यामागचा उद्देश आहे.जनजागृतीच्या पोस्टर्सचे प्रमाण कमीमतदानापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी निवडणूक आयोगाकडून विविध उपक्रम राबविण्यात आले. मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी एस्. टी. बसवर जागृतीची पोस्टर्स लावण्यात आली आहेत. मात्र, शासकीय योजनांचे पोस्टर्सच्या प्रमाणात ही पोस्टर्स खूपच कमी असल्याचे दिसत आहे. मोजक्याच गाड्यांवर ही पोस्टर्स लावण्यात आली आहेत.